“ब्रेस्ट सर्जरी कर, ओठांमध्ये फिलर घे”

दिया मिर्झाने उघड केला चित्रपटसृष्टीतील सौंदर्याच्या दबावाचा अनुभव

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
मुंबई
dia mirza  चित्रपटसृष्टी वरून जितकी ग्लॅमरस दिसते, तितकीच तिच्या पडद्यामागे अनेक कठोर वास्तव दडलेली आहेत. अभिनेत्री दिया मिर्झाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फिल्म इंडस्ट्रीतील महिलांवर असणाऱ्या सौंदर्याच्या दबावाविषयी स्पष्टपणे भाष्य केले. पुरुषप्रधान चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींना त्यांच्या दिसण्यावरून सातत्याने जज केले जाते आणि अनेकदा कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी अप्रत्यक्षपणे भाग पाडले जाते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
 

dia mirza  
 
दिया मिर्झा यांनी सांगितले की, चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या लूकबाबत वारंवार टिप्पणी करण्यात येत होती. काही जण त्यांना ओठांमध्ये फिलर घेण्याचा सल्ला देत, तर काहींनी ब्रेस्ट एन्हान्समेंट करण्याचा सल्लाही दिला होता. या अनुभवांमुळे इंडस्ट्रीतील सौंदर्याच्या निकषांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
दिया म्हणाल्या, चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर अनेक महिलांना आपण पुरेशा सुंदर नाही, आपले फिचर्स अपुरे आहेत, अशी भावना निर्माण केली जाते. चित्रपटांमध्ये संधी मिळवायची असेल तर आपल्या लूकमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांना सतत जाणवून दिले जाते.कॉस्मेटिक सर्जरीच्या वाढत्या ट्रेंडबाबत बोलताना त्यांनी सांगितले, “आजकाल महिलांमध्ये कॉस्मेटिक सर्जरी करण्याची प्रवृत्ती वाढत आहे आणि यामागे पुरुषप्रधान मानसिकता कारणीभूत आहे. हे भीतीदायक आहे, कारण पूर्वीपेक्षा अधिक महिला आता अशा शस्त्रक्रियांमध्ये रस दाखवत आहेत. या इंडस्ट्रीला पुढे नेणारे बहुतांश पुरुष आहेत आणि ही संपूर्ण व्यवस्था अनेकदा भीतीवर आधारित चालते.”त्या पुढे म्हणाल्या, “जर एखादी महिला आपल्या नैसर्गिक नैन-नक्शांमध्ये बदल करून कॉस्मेटिक सर्जरीचा पर्याय निवडत असेल, तर त्यामागे कुठेतरी एखाद्या पुरुषाने तिला ती पुरेशी सुंदर नाही, असे जाणवून दिलेले असते. सुंदर दिसण्यासाठी स्वतःमध्ये बदल करावा लागेल, ही भावना तिच्या मनात रुजवली जाते.”स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलताना दिया मिर्झा यांनी सांगितले की, “मीदेखील या सगळ्याचा सामना केला आहे. मला अनेकदा सांगितले गेले की, माझ्या दिसण्यात कोणते बदल करावेत आणि अधिक सुंदर दिसण्यासाठी काय करावे. विशेष म्हणजे असे सल्ले मला नेहमी पुरुषांकडूनच मिळाले.”त्या पुढे म्हणाल्या, “कधीही कोणत्याही महिलेने मला ‘ओठांमध्ये फिलर लाव, तुझे ओठ खूप पातळ आहेत’ किंवा ‘ब्रेस्ट्स मोठे कर, ते खूप लहान आहेत’ असे सांगितले नाही. अशा प्रकारच्या टिप्पणी नेहमी पुरुषांकडूनच आल्या. हेच वास्तव आहे.”दिया मिर्झा यांनी सांगितले की, अवघ्या २० वर्षांच्या वयात दोन ब्युटी पेजंट जिंकल्यानंतरही जेव्हा त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, तेव्हाही त्यांना अशाच प्रकारच्या टिप्पण्यांना सामोरे जावे लागले. प्रत्येक दुसरा व्यक्ती त्यांना अधिक सुंदर दिसण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याचा सल्ला देत होता. या अनुभवांनी त्यांना मोठा मानसिक धक्का बसल्याचेही त्यांनी नमूद केले.