वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

जिल्ह्यातून आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक रवाना

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
वाशीम,
safety-of-warkaris : पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व आपत्कालीन मदतीसाठी जिल्ह्यातून प्रथमच आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक रवाना करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला असून, जिल्ह्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद उपक्रम ठरला आहे.
 
 
 
jkl
 
 
 
वाशीम-मंगरुळनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच किशोर देशमुख आणि सचिन राणे यांच्या समन्वयातून हे पथक पंढरपूरकडे रवाना झाले आहे. आषाढी वारीदरम्यान उद्भवणार्‍या आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत, बचावकार्य, गर्दीचे व्यवस्थापन, हरविलेल्या व्यक्तींना मदत तसेच आवश्यक आपत्कालीन सेवा पुरविण्याची जबाबदारी हे पथक पार पाडणार आहे.
 
 
पथकाच्या प्रस्थानापूर्वी आमदार श्याम खोडे आणि जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते नारळ फोडून पथकाला शुभेच्छा देत रवाना करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, संबंधित विभागांचे अधिकारी, बचाव पथकाचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
आषाढी वारीसाठी प्रथमच वाशीम जिल्ह्यातून आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक सेवेसाठी रवाना झाल्याने या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, भाविकांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या पुढाकाराचे नागरिकांकडूनही विशेष कौतुक करण्यात येत आहे. पथकातील सदस्यांना पंढरपूर येथे जाण्यासाठी कारंजा येथील गुरु मंदिर संस्थांच्या वतीने रुग्णवाहीका मोफत उपलब्ध करून देण्यात आली.