गडचिरोली,
gadchiroli-news : समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मानधनाचा त्याग करण्याचा आदर्श गडचिरोलीत पाहायला मिळत आहे. गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष ड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी आपल्या संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळातील मानधन शिक्षणासाठी समर्पित करण्याची घोषणा केली असून, नगरसेवक सागर निंबोरकर यांच्या स्वखर्चातील योगदानासह एकूण 20 लाखांचा शैक्षणिक निधी उभारण्याचा संकल्प केला आहे.
या उपक्रमांतर्गत प्रणोती निंबोरकर यांच्या कार्यकाळातील सुमारे 12 लाखांचे मानधन या निधीत जमा करण्यात येणार आहे. तसेच नगरसेवक सागर निंबोरकर यांच्या स्वखर्चातून आर्थिक योगदान दिले जाणार असून, 20 लाखांपर्यंतची रक्कम टप्प्याटप्प्याने खर्च करण्यात येणार आहे.
या निधीतून वडिलांचे छत्र हरपलेल्या, अत्यंत गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही होतकरू विद्यार्थ्याचे शिक्षण अर्धवट राहू नये किंवा त्याला शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, हीच या उपक्रमामागील प्रमुख भावना असल्याचे निंबोरकर दाम्पत्याने स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मानधनातून समाजोपयोगी कार्यासाठी पुढाकार घेण्याचा हा निर्णय गडचिरोलीत कौतुकाचा विषय ठरत असून, विविध स्तरांतून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.
कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये
आर्थिक अडचणीमुळे एखाद्या विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हीच आमची भूमिका आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला सक्षम करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न असून, गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा आमचा कायम प्रयत्न राहील, अशी भावना प्रणोती व सागर निंबोरकर यांनी व्यक्त केली.