नागपूर,
electricity bill पावसाळा सुरू झाला असून उन्हाळ्याचा कडाका ओसरला आहे. कूलर, एसी बंद झाले आहेत. तरीही नागपुरातील वीज ग्राहकांना उन्हाळ्यासारखेच अव्वाच्या सव्वा वीज बिल आले आहे. जून आणि जुलै महिन्याच्या बिलात ३०० ते ५०० युनिटपर्यंत वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा शॉक बसला आहे. वीज वापर कमी असतानाही बिलात वाढ झाल्याने महावितरणच्या विरोधात ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे.
मे महिन्याच्या तुलनेत जून-जुलैच्या बिलात ३०० ते ५०० युनिट आणि ८०० ते १५०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे ‘वीज वापर कमी केला तरी बिल कमी का होत नाही?‘ असा सवाल आता ग्राहक विचारत आहेत. शहरातील अनेक भागातील ग्राहकांनी सांगितले की, मे महिन्यात ४०० युनिटपर्यंत गेलेले बिल जूनमध्येही ३८०-४२० युनिटच्या घरातच आहे. सीताबर्डीच्या गृहिणी म्हणाल्या, ‘कूलर बंद केला, पंखेही कमी लावतोय तरी बिल २४०० रुपयांच्या खाली येतच नाही. बिल्डिंग सोसायट्यांमध्येही कॉमन लाईट आणि लिफ्टचे बिल वाढल्याच्या तक्रारी आहेत.
महावितरणचे काय म्हणणे?
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यासाठी ३ मुख्य कारणे दिली आहेत:
-मीटर रीडिंगचा फरक : उन्हाळ्यात रीडिंगला उशीर झाल्याने २ महिन्यांचे युनिट एकत्रित बिलात आले
-फ्यूल सरचार्ज आणि इंधन समायोजन खर्च : कोळशाचे दर वाढल्याने प्रति युनिट सरचार्ज वाढला आहे
-पावसाळ्यातील ओलावा आणि लोड : दमट हवेमुळे फ्रीज, वॉटर पंप आणि इतर उपकरणांवर लोड वाढतो. तसेच घरात दिवे जास्त वेळ सुरू राहतात.
अधिकारी म्हणाले, ‘पावसाळ्यात वापर कमी वाटत असला तरी प्रत्यक्ष युनिटमध्ये मोठा फरक पडत नाही. त्यामुळे बिलही उन्हाळ्यासारखेच दिसते.
बिलात कोणते घटक वाढले?
ग्राहकांच्या बिलात फक्त युनिटच नाही तर फिक्स्ड चार्ज, फ्यूल एडजस्टमेंट चार्ज, इले्ट्रिरसिटी ड्युटी या घटकांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे १०० युनिट वापर कमी झाला तरी बिलात ३००-४०० रुपयांनी घट होत नाही.electricity bill ऊर्जा तज्ज्ञांच्या मते, स्मार्ट मीटर नसल्याने सरासरी रीडिंगचा अंदाज आणि बिलिंग सायकलचा गोंधळ यामुळे असे होते. तसेच पावसाळ्यात व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे उपकरणे जास्त वीज ओढतात.
ग्राहकांनी काय करावे?
महावितरणने ग्राहकांना आवाहन केले आहे की,
-मीटर रीडिंग स्वतः तपासा आणि ॲपवर फोटो अपलोड करा
-बिलातील तपशील बारकाईने वाचा
-तक्रार असल्यास महावितरणच्या कॉल सेंटर किंवा जवळच्या कार्यालयात संपर्क साधा
-ऊर्जा कार्यक्षम उपकरणे वापरा