भेसळ करणाऱ्यांचा एआय आणि ब्लॉकचेनने मागोवा
-एफडीएची नवी एकात्मिक प्रणाली
- एका नावावर किती दुकाने, किती कारवाई
-तीन महिन्यांत सर्व आस्थापनांचे होणार ऑडिट
नागपूर,
fda तुम्ही ज्या हॉटेलमध्ये भोजन करायला जाता, त्या आस्थापनेने यापूर्वी भेसळ केली होती का, त्यावर कारवाई झाली होती का, याचा संपूर्ण इतिहास आता ग्राहकांना एका क्लिकवर मिळणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून एकात्मिक ऑनलाईन प्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या नावावर असलेल्या विविध हॉटेल्स, स्वीट मार्ट आणि खाद्य आस्थापनांचा सर्व रेकॉर्ड समोर येणार आहे.
नागपुरात कसा होणार फायदा?
नागपुरात सुमारे २० हजारांवर नोंदणीकृत खाद्य आस्थापना आहेत. नवीन प्रणालीमुळे
-हिस्ट्री ट्रॅकिंग - एखाद्या मालकाचे बेसामधील दुकान, प्रतापनगरातील बेकरी आणि सीताबर्डीचे हॉटेल एकाच डॅशबोर्डवर दिसतील
-भूतकाळातील कारवाई - ५ वर्षांत कोणत्या आस्थापनेवर किती वेळा दंड, नोटीस किंवा परवाना निलंबन झाले हे दिसेल
-रीअल टाईम ऑडिट - खाद्यपदार्थ तयार करण्यापासून साठवणूक, वाहतूक ते ग्राहकांपर्यंत २२ मानकांचे पालन होते की नाही यावर लक्ष
ब्लॉकचेनने धागेदोरे सापडणार
एकाच व्यक्तीचे खाद्यपदार्थ किंवा औषध क्षेत्रातील विविध व्यवसाय असतील तर ब्लॉकचेनच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा मागोवा घेता येणार आहे.
भेसळखोरांवरच नव्हे तर मानकानुसार खाद्यान्न तयार होते की नाही यावर एफडीए नियामक म्हणून देखरेख करत आहे. मानकांची पूर्तता करण्याची जबाबदारी उत्पादकांपासून वितरण साखळीतील प्रत्येक घटकाची आहे.
तक्रार पोर्टल आणि डॅशबोर्ड
नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी नवीन पोर्टल तयार करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्याने वेळेत कार्यवाही न केल्यास स्वयंचलितपणे वरिष्ठांना माहिती जाईल.
राज्यातून सर्वाधिक तक्रारी पुण्यातून आल्या आहेत. त्यात अस्वच्छ अन्नाच्या तक्रारींचा समावेश जास्त आहे. नागपुरातही गेल्या ६ महिन्यांत ३४० हून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.
नवीन प्रणालीचे ४ फायदे
-एकात्मिक डेटा - एका मालकाच्या सर्व आस्थापनांची माहिती एकत्र
-पारदर्शकता - ग्राहकाला आस्थापनेचा भूतकाळ समजणार
-वेगवान कारवाई - तक्रारीवर ऑटो एस्केलेशन
-प्रतिबंध - भेसळ करण्यापूर्वीच धास्ती