पाच मित्रांचा सेल्फीचा थांबा ठरला अखेरचा!

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
नरसिंगपूर,
Five killed in horrific accident in Narsingpur मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यात महामार्गावर घडलेल्या भीषण अपघातात सहलीवरून परतणाऱ्या पाच मित्रांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. धबधब्यावर फिरून परतत असताना हे सहा मित्र राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 45 वर फोटो काढण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या एका अवजड वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी नरसिंगपूर-जबलपूर सीमेवरील हाथिनाला धबधब्यावरून परतल्यानंतर इंदिरा नगर परिसरात हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मित्रांना भरधाव वाहनाने चिरडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.
 

acdent 
सुआताला पोलीस ठाण्याच्या प्रभारी प्रियांका केवट यांनी सांगितले की, मृतांमध्ये राजेंद्र पटेल (22), वीरेंद्र लोधी (20), रामपाल सिंग लोधी (21), जयपाल सिंग लोधी (30) आणि नीरज सिंग लोधी (25) यांचा समावेश आहे. आकाश सिंग लोधी (24) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वजण जबलपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.अपघातानंतर संबंधित वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघात ट्रकने की डंपरने घडवला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नसून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून वाहन आणि चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, धबधब्यावरून परतल्यानंतर मित्रांनी महामार्गाच्या कडेला थांबून फोटो काढण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. या दुर्घटनेत राजेंद्र पटेल यांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित चार जणांचा रुग्णालयात नेत असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.