अनिल कांबळे,
नागपूर,
gold-loan-scam : आयसीआयसीआय बँकेच्या ९ विविध शाखांमध्ये बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून बँकेची २३ कोटी १९ लाख ४१ हजार ७५१ रुपयांची फसवणूकीच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्ह्यातील फरार आरोपी दिनेश कृष्णराव नागपूरे (शेषनगर) याला सोमवारी अटक अटक केली. न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेचे विभागीय प्रमुख धनंजय रमेश थिटे (४९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा घोटाळा उघडकीस आला. बँकेच्या मनीषनगर शाखेत गोल्ड लोन ऑडिट दरम्यान तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे प्रथम निदर्शनास आले. यानंतर संपूर्ण ९ शाखांचे ऑडिट केले असता, एकूण १५९ खातेदारांनी बनावट सोने तारण ठेवून कर्ज उचलल्याचे समोर आले. जानेवारी २०२३ ते आॅक्टोबर २०२५ दरम्यान बँकेचे खातेदार सचिन राऊत, व्हॅल्युअर (सोने पारखी) नंदू खरवडे, ऑडिटर राजेंद्र शिळणकर, प्रमोद टेटे, धनंजय ढोमणे आणि शाखा प्रमुख पंकज केकतपुरे यांच्यासह १५२ खातेदारांनी आपापसात संगनमत करून हा कट रचला होता. त्यांनी बनावट सोने खरे असल्याचे भासवून बँकेतून कोट्यवधींचे कर्ज घेऊन विश्वासघात केला. याप्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
आणखी काही जण रडारवर
या महाघोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर पोलिसांनी यापूर्वीच प्रमोद भैय्याजी टेटे, राजेंद्र पुंडलिकराव शिळणकर, पंकज प्रभाकर केकतपुरे आणि नंदू श्रीहरी खरवडे यांना अटक केली होती. आता या प्रकरणातील फरार आरोपी दिनेश नागपुरे यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.