स्वखर्चाने केली रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी

छत्रपती शिवाजी संकूलचा स्तुत्य उपक्रम ः दुतर्फा वृक्षारोपणही

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
मुल्ला, 
chhatrapati-shivaji-sankul : देवरी येथील एमआयडीसी परिसरातील मुख्य रस्त्याची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे वाहनधारकांना होणारा त्रास लक्षात घेता, स्थानिक छत्रपती शिवाजी संकूल आणि कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थाच्या वतीने 20 जुलै रोजी एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवून स्वखर्चाने रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली, तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण करण्यात आले.
 
 
chhatrapati-shivaji-sankul
 
एमआयडीसी परिसरातील या मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले होते. याच मार्गावरून परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांचे शेकडो विद्यार्थी दररोज ये-जा करतात. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. तसेच लहान-मोठे अपघात घडणे ही येथील नित्याचीच बाब झाली होती. ही गंभीर समस्या ओळखून संस्थेने तातडीने पावले उचलली. कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेचे सचिव अनिलकुमार येरणे यांच्या विशेष पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण दुरुस्तीचा खर्च संस्थेने स्वतः उचलला. रस्ता दुरुस्तीसोबतच भविष्यात हा मार्ग हिरवागार आणि सावलीयुक्त व्हावा, या उद्देशाने रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. या महत्त्वपूर्ण उपक्रमाप्रसंगी कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे प्रामुख्याने उपस्थित होते. संस्थेच्या या कौतुकास्पद कार्यामुळे विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त होत असून संस्थेच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.