शासनाचा शाळकरी विद्यार्थ्यांमध्येही भेदभाव!

-पीएमश्री योजनेतून दोन गणवेश तर समग्रच्या निधीची प्रतीक्षाच -पालकांसह शिक्षकांमध्येही असंतोष

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
गोंदिया,
gondia-news : विकास कामासाठी निधी वाटपात भेदभाव करण्यात येत असल्याचे आरोप शासनावर होत असताना आता विद्यार्थ्यांच्या संदर्भातही असाच प्रकार होत आहे. विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत देण्याची योजना असताना या गणवेश वाटपात भेदभाव करीत केवळ पीएमश्री योजनेतील विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचा निधी वाटप करण्यात आला असून समग्रच्या विद्यार्थ्यांना मात्र, अद्यापही आपल्या दुसर्‍या गणवेशाची प्रतीक्षाच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांमध्येही असंतोष पसरला आहे.
 
 
gondia-news
 
 
 
शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत गणवेश देण्याची योजना आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी निधी देण्यात येते. पीएमश्री योजनेंतर्गत निवड झालेल्या शाळा व विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून तर समग्र शिक्षा अभियानंतर्गत शाळांना केंद्र व राज्य शासनाकडून निधी देण्यात येते. दरम्यान, दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची योजना आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येत असून प्रति विद्यार्थी एका गणवेशासाठी 300 रुपये देय आहे. यानुसार जिल्ह्यात यंदा 74 हजार 290 विद्यार्थ्यांसाठी गणवेश, पाठ्यपुस्तक व आता जोडे-मोजे खरेदीचे नियोजन करावयाचे आहे. यामध्ये समग्र शिक्षातील 63 हजार 494 विद्यार्थी, पीएमश्रीतील चार हजार 571 विद्यार्थी, तर राज्य शासनाच्या इतर शाळांतील सहा हजार 225 विद्यार्थी आहेत. दरम्यान, पीएमश्री योजनेतील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाकडून दोन्ही गणवेशाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, राज्य शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना एकाच गणवेशाचा निधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यातही दुजाभाव करण्यात आला असून एका गणवेशासाठी केवळ 240 रुपयेच देण्यात आले आहे. तर दुसर्‍या गणवेशाचा निधी केव्हा येईल, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच गणवेशावर भागवावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आता शासनाकडून भेदभाव केले जात आहे का असा प्रश्न पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे.
 
 
आम्ही गोरगरीब आहोत. त्यामुळे जिप शाळांमध्ये मुलांना शिक्षणसाठी दाखल केले. मात्र, आमच्या मुलांना केवळ एक गणवेश देण्यात आला असून, अद्यापही बुट, मोजे देण्यात आले नाही. याउलट पीएमश्री शाळेमध्ये ज्ञानार्जन करणार्‍या मुलांना दोन गणवेश दिले गेले. असा भेदभाव करू नये.
मुनेश्वर कोल्हारे, पालक झांजिया
 
 
पीएमश्री शाळा व अन्य शाळा शासन प्रशासनच चालविते. मग पीएमश्री व अन्य शाळांतील मुलांमध्ये शासनाने सुविधा देताना भेदभाव करू नये. सर्वच मुलांना समान सुविधा पुरवाव्यात, अशी अपेक्षा आहे.
योगेश साठवणे, पालक, झांजिया
 
 
पीएमश्री योजनेसाठी दोन तर समग्रअंतर्गत एकाच गणवेशाचा निधी शासनाकडून आला. तो शाळांना वितरित करण्यात आला, शिवाय जोडे मोज्यांसाठी अद्यापही निधीची प्रतिक्षा आहे. या साहित्यासाठी निधीच आला नाही.
पवन खंडारे, जि.प. शिक्षणाधिकारी (प्राथमीक) गोंदिया