दरड कोसळून चार पर्यटक गंभीर जखमी

मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेल्या दोघांना ग्रामस्थांनी वाचवले

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
मुंबई
harishchandragad landslide पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारदरा परिसरातील ऐतिहासिक हरिश्चंद्रगडावर रविवारी मोठी दुर्घटना घडली. गडावरून खाली उतरत असताना अचानक दरड कोसळल्याने मुंबईतील मालाड येथील चार पर्यटक गंभीर जखमी झाले. रविवारच्या सुट्टीमुळे हरिश्चंद्रगड परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असतानाच ही दुर्घटना घडली.
 

harishchandragad landslide injures four mumbai tourists during monsoon trek 
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड परिसरातील १० पर्यटकांचा एक गट हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी आला होता. रविवारी दिवसभर परिसरात रिमझिम पाऊस सुरू असताना हा गट गडावरून खाली उतरत होता. यावेळी गडावरील आडव्या कठड्याच्या मागील बाजूस पोहोचताच अचानक दरड कोसळली.अचानक कोसळलेल्या माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली दोन पर्यटक थेट गाडले गेले, तर अन्य दोन पर्यटकांना दगडांचा जोरदार मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. सुदैवाने, घटनास्थळी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेले लोखंडी रेलिंग होते. या रेलिंगचा आधार मिळाल्याने पर्यटक खोल दरीत कोसळण्यापासून बचावले.
 
 
अपघाताची माहिती मिळताच सोबतच्या पर्यटकांनी आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका स्थानिक ग्रामस्थाने तातडीने पायथ्याशी असलेल्या गावातील नागरिक तसेच वन्यजीव विभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वेळ न दवडता गडावर धाव घेतली.
 
 
ग्रामस्थांनी युद्धपातळीवर बचावकार्य  harishchandragad landslide राबवत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर जखमी पर्यटकांना उचलून गडाच्या पायथ्याशी आणण्यात आले.जखमी पर्यटकांना तातडीने राजूर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.या दुर्घटनेत जखमी झालेल्या पर्यटकांची नावे राम प्रकाश यादव, निलेश गोमाटी विश्वकर्मा, कृष्णा कुमार साहू आणि दिनेश संजय साहू अशी आहेत.पावसाळ्यात गड-किल्ल्यांवर ट्रेकिंग करताना पर्यटकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका वाढत असल्याने धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.