ठाणे
kalyan murder case ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. अडवली-ढोकळी परिसरातील नीलकंठ सोसायटीमधील एका बंद फ्लॅटमध्ये मानवी मृतदेहाचे तुकडे करून ते गोणीत भरून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नीलकंठ सोसायटीतील एका बंद फ्लॅटमधून गेल्या काही दिवसांपासून तीव्र दुर्गंधी येत होती. ही दुर्गंधी असह्य झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांना संशय आला. त्यांनी तातडीने याबाबत मानपाडा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.पोलिसांनी घराची पाहणी केली असता एका गोणीत मानवी मृतदेहाचे तुकडे करून भरल्याचे आढळून आले. हा प्रकार पाहून पोलिसही हादरले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपासासाठी आणि शवविच्छेदनासाठी तो रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या प्रकरणातील मृत व्यक्तीची ओळख kalyan murder case अद्याप पटलेली नाही. प्राथमिक तपासात मृत व्यक्ती एका महिलेसोबत या घरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये किंवा भाड्याने राहत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, संबंधित व्यक्ती कोण आहे आणि ती महिला सध्या कुठे आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मानपाडा पोलिसांकडून परिसरातील नागरिक तसेच घरमालकाची कसून चौकशी सुरू आहे.
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृतदेहाचे निर्घृणपणे तुकडे करून ते गोणीत भरण्यामागील नेमका उद्देश काय होता, हे जाणून घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. हे कृत्य कोणी आणि कोणत्या कारणातून केले, याचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत.