कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने ७.५ कोटींची फसवणूक

- : महिला वर्गाला केले टार्गेट - : आरोपींविरुद्ध तहसील व शांतीनगर पोलिसांत गुन्हे दाखल

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
loan-fraud : महिलांना सोसायटी आणि बचत गटांमधून कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून, त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत तब्बल ७ कोटी ६८ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करून फसवणूक केली. या प्रकरणी तहसील आणि शांतीनगर पोलिस ठाण्यांत आरोपी मंदा गोपालराव गुमगावकर (४२, जागनाथ बुधवारी) आणि तिचा साथीदार शुभम यांच्याविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. या दोन्ही आरोपींनी महिला वर्गाला टार्गेट केले असून नागपूरसह राज्यातील अन्य शहरातील महिलांचाही अशा प्रकारच्या फसवणुकींमध्ये समावेश असू शकतो.
 
 

KL 
 
 
 
प्राप्त माहितीनुसार, पहिली घटना ३० मे ते १६ जून दरम्यान घडली. नंदा नितीन बेंडेकर (३८, बिनाकी मंगळवारी) आणि त्यांच्या वस्तीतील इतर ३९ महिलांना आरोपींनी लोन मंजूर करून देतो असे सांगितले. यासाठी ओळख प्रमाणपत्र, इतर कागदपत्रे आणि प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. आरोपींनी एकूण ४० महिलांकडून कागदपत्रे व ८० हजार रुपये गोळा केले. मात्र, लोन न देता आरोपींनी या कागदपत्रांचा गैरवापर केला आणि १५ महिलांच्या नावे परस्पर बँक खाती उघडली. या खात्यांमधून आरोपींनी ७ कोटी ५० लाख ७८ हजार ९८१ रुपयांचा मोठा आर्थिक व्यवहार करून महिलांची फसवणूक केली.
 
 
दुसऱ्या घटनेत, ४ जून ते १६ जुलै दरम्यान शांतीनगर हद्दीतील मानसी विजय निमजे (२८, लालगंज) यांना बचत गटातून लोन काढून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. आरोपींनी त्यांची कागदपत्रे घेऊन एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये खाते उघडले आणि मानसी निमजे यांना कोणतीही कल्पना न देता त्यांच्या खात्यातून १७ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा आर्थिक व्यवहार केला. तसेच परिसरातील इतर महिलांकडूनही कागदपत्रे व रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली. दोन्ही प्रकरणी तहसील आणि शांतीनगर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
 
 
रॅकेट राज्यभर सक्रिय !
 
 
आरोपी मंदा गुमगावकर आणि साथीदार शुभम हे दोघेही मोहरे असून या रॅकेटचे सूत्रधार अन्य कुणीतरी आहे. त्या म्होरक्याने नागपूरमधील महिलांची फसवणूक करण्यासाठी मंदा आणि शुभमला हाताशी धरले. मुख्य आरोपीचे मोठे रॅकेट राज्यभर सक्रिय असून याच पद्धतीने महिलांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस रॅकेटचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत आहे.