मुंबई
maharashtra monsoon महाराष्ट्रात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आगामी आठवडाभरात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उपग्रह छायाचित्रांमध्ये उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतात मान्सून अत्यंत सक्रिय स्थितीत असल्याचे दिसून येत असून, संपूर्ण महाराष्ट्रावरही ढगांची दाटी निर्माण झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील किनारी भागांसह लगतच्या घाट परिसरात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता असून, पुढील 24 तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाट क्षेत्रातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने maharashtra monsoon पावसाचे इशारे जारी केले आहेत. सातारा जिल्ह्यातील घाट क्षेत्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने येथे ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याच्या घाट भागासाठी जोरदार पावसाचा इशारा देत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.याशिवाय अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
20 जुलैच्या हवामान अंदाजानुसार, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट भागात पावसाचा ‘यलो अलर्ट’ कायम राहणार आहे. तसेच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तसेच ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यातील अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा संपण्याची शक्यता असून, शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.