वॉशिंग्टन,
Messi cried. फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात स्पेनकडून 1-0 असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी भावनाविवश झाल्याचे पाहायला मिळाले. न्यू जर्सीतील मेटलाइफ स्टेडियमवर झालेल्या या लढतीत अर्जेंटिनाचे सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. पराभवानंतर मेस्सीला अश्रू आवरता आले नाहीत आणि त्याचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.रविवारी (19 जुलै) रंगलेल्या अंतिम सामन्यात नियोजित 90 मिनिटांत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळेत स्पेनने निर्णायक गोल करत 1-0 अशी आघाडी घेतली आणि 16 वर्षांनंतर दुसरे फिफा विश्वचषक विजेतेपद आपल्या नावावर केले.
अंतिम शिट्टी वाजल्यानंतर मेस्सी मैदानावरच गुडघ्यावर बसून भावुक झाल्याचे दिसले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतरही तो अश्रू अनावर झालेल्या अवस्थेत दिसला. स्टेडियममधील हजारो चाहत्यांनी "मेस्सी, मेस्सी" अशा घोषणांनी त्याचा गौरव केला. अनेक चाहते पोस्टर आणि फलक घेऊन आपल्या आवडत्या खेळाडूला भावपूर्ण निरोप देताना दिसले.पराभव झाला असला तरी मेस्सीने या सामन्यात एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात तीन अंतिम सामने खेळणारा तो केवळ दुसरा फुटबॉलपटू ठरला. तसेच 39 वर्षांच्या वयात विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळणारा सर्वात वयस्कर मैदानी खेळाडू होण्याचाही मान त्याने मिळवला. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात अर्जेंटिनाला मोठा धक्का बसला. मिडफिल्डर एन्झो फर्नांडिसला दुसरे पिवळे कार्ड मिळाल्यानंतर लाल कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे अर्जेंटिनाला उर्वरित सामना 10 खेळाडूंसह खेळावा लागला. या संधीचा फायदा घेत स्पेनने सातत्याने आक्रमण केले आणि फेरान टोरेसने अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल करत स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.