36 तासांत राजधानीत पोहोचणार शेतमाल

पश्चिम महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
सांगली,
kisan rail service सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि विजयपूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. फळे, भाजीपाला, फुले तसेच इतर नाशिवंत कृषी उत्पादनांची देशातील प्रमुख बाजारपेठांपर्यंत जलद आणि सुरक्षित वाहतूक करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या मिरज ते दिल्ली किसान रेल सेवेला अखेर रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली आहे. ही बहुप्रतीक्षित किसान रेल सेवा 15 डब्यांची असणार असून, दर शनिवारी दुपारी 4 वाजता मिरज स्थानकातून दिल्लीच्या दिशेने रवाना होईल. पंढरपूर आणि कुर्डूवाडी मार्गे धावणारी ही रेल्वे अवघ्या 36 तासांत राजधानी दिल्लीमध्ये पोहोचणार आहे.
 

miraj to delhi kisan rail service approved, farmers to reach capital market in 36 hours 
सांगली परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर गुणवत्तापूर्ण भाजीपाला आणि इतर कृषी उत्पादनांचे उत्पादन घेतात. मात्र, या शेतमालाला देशातील प्रमुख बाजारपेठांपर्यंत पोहोचवताना वाहतूक व्यवस्था आणि खर्च ही मोठी अडचण ठरत होती. शेतकऱ्यांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे, वाहतूक खर्च कमी करणे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे या उद्देशाने किसान रेल सेवा सुरू करण्यासाठी सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.मिरज येथूनच ही सेवा सुरू व्हावी, अशी भूमिका प्रशासनाने सुरुवातीपासून मांडली होती. यामागे केवळ रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश नसून, मिरज-सांगली परिसराला कृषी लॉजिस्टिक आणि आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून विकसित करण्याची व्यापक संकल्पना होती. या उपक्रमामुळे भविष्यात परिसरात शीतगृहे, पॅक हाउसेस, वेअरहाउसिंग सुविधा, प्रक्रिया उद्योग तसेच वाहतूक आणि kisan rail service  रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.किसान रेल सेवेसाठी मिरज-दिल्ली मार्गावर 4.5 रुपये प्रति किलो असा दर निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान, या दरात 50 टक्के अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनुदान मंजूर झाल्यास शेतकऱ्यांना प्रतिकिलो 2 रुपये 25 पैसे इतक्या दरात माल वाहतूक करता येणार असून, हा दर शेतकऱ्यांना परवडणारा ठरेल. यापूर्वी मिरज-मुंबई किसान रेल सेवेसाठी 0.75 पैसे प्रति किलो असा दर होता; अनुदान मिळाल्यास तो आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
मिरज ते दिल्ली किसान रेल्वेसेवेला मिळालेली मान्यता ही केवळ नवीन रेल्वे सेवेची सुरुवात नसून, पश्चिम महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पासाठी रेल्वे प्रशासन, कृषी विभाग, शेतकरी संघटना, व्यापारी तसेच सर्व संबंधित घटकांनी दिलेले सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे.किसान रेल सेवा सुरू झाल्यानंतर सांगली जिल्ह्यासह आसपासच्या भागातील शेतमालाला राष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचण्याचा अधिक वेगवान मार्ग उपलब्ध होणार असून, हा उपक्रम जिल्ह्याच्या कृषी विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास विविध स्तरांतून व्यक्त केला जात आहे.