‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ला राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
मुंबई
mukkam post bombilwadi ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शनिवारी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नवी दिल्लीत करण्यात आली. भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या या पुरस्कारांमध्ये यंदा मराठी सिनेसृष्टीनेही आपली दमदार उपस्थिती नोंदवली. दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी फीचर फिल्मचा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
 

mukkam post bombilwadi wins best marathi feature film at 72nd national film awards 
यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये विविध भारतीय भाषांतील चित्रपटांचा गौरव करण्यात आला. हिंदी चित्रपट ‘श्रीकांत’ने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा सर्वोच्च पुरस्कार पटकावला. याशिवाय अभिनय, दिग्दर्शन, पटकथा, संगीत, छायांकन, संकलन आणि इतर तांत्रिक विभागांतील विजेत्यांचीही घोषणा करण्यात आली. परीक्षक मंडळाने २०२४ या वर्षात प्रदर्शित झालेल्या आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) प्रमाणित करण्यात आलेल्या चित्रपटांचा विचार करून विजेत्यांची निवड केली.
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा सन्मान मिळाल्याने या चित्रपटाच्या यशात आणखी एका प्रतिष्ठेच्या पुरस्काराची भर पडली आहे.
‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’मध्ये विनोद, इतिहास आणि कल्पनारंजन यांचा अनोखा मिलाफ पाहायला मिळतो. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर उलगडणाऱ्या या कथेत एका छोट्या गावात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमधून मनोरंजनासोबतच उपरोधिक भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटात प्रशांत दामले, आनंद इंगळे, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, मनमीत पेम आणि प्रणव रावराणे यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा पुरस्कार अभिमानाचा क्षण मानला जात आहे. आशयघन कथा, दर्जेदार दिग्दर्शन आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’च्या सन्मानामुळे मराठी चित्रपटसृष्टीला आणखी प्रोत्साहन मिळाले असल्याची भावना व्यक्त होत आहे. यंदाच्या पुरस्कारांसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालेल्या चित्रपटांचा विचार करण्यात आला.
‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे परेश मोकाशी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर आपली छाप उमटवली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या धाटणीचे, प्रयोगशील आणि आशयसमृद्ध चित्रपट देणारे दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे.
परेश मोकाशी यांनी आपल्या कलाप्रवासाची सुरुवात रंगभूमीपासून केली. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि पटकथाकार अशा विविध भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांचा पहिलाच चित्रपट ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (२००९) मोठ्या प्रमाणात गाजला होता. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच हा चित्रपट ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका ठरला होता.
यानंतर २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटानेही राष्ट्रीय स्तरावर विशेष छाप पाडली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पंढरपूरच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाचे देशभरातून कौतुक झाले.
त्यानंतर ‘ची व ची सौ का’, ‘वाळवी’, ‘आत्मपॅम्फ्लेट’, ‘नाच गं घुमा’ अशा विविध विषयांवरील चित्रपटांच्या माध्यमातून मोकाशी यांनी प्रेक्षकांना वेगवेगळे सिनेमॅटिक अनुभव दिले. त्यांच्या ‘वाळवी’ या चित्रपटालाही राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मान मिळाला होता.
राष्ट्रीय पुरस्कारांव्यतिरिक्त परेश मोकाशी यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) पुरस्कार, गोळ्लापुडी श्रीनिवास पुरस्कार, अरविंदन पुरस्कार तसेच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या चित्रपटांना कथानक, पटकथा आणि दिग्दर्शनासाठी सातत्याने प्रशंसा मिळाली आहे.
आता ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे परेश मोकाशी यांच्या नावावर आणखी एक मानाचा राष्ट्रीय सन्मान जमा झाला आहे. दर्जेदार आणि आशयपूर्ण चित्रपटांची परंपरा कायम ठेवणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये त्यांचे नाव पुन्हा एकदा अग्रक्रमाने घेतले जात आहे.