cockroach-janata-party विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे आणि परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी एका निवेदनातून केले. कॉक्रोच जनता पार्टीतर्फे सोमवारी संसद मार्चचे आवाहन करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदत आंदोलकांनी संसदभवनाच्या प्रवेशद्वारापर्यंत धडक मारली. रेलभवनापर्यंत आंदोलक पोहोचले होते, याठिकाणी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर आंदोलकांचे प्रतिनिधी आणि नड्डा यांच्यात चर्चा झाली. कॉक्रोच जनता पार्टीच्या सौरव दास आणि आशुतोष रांका या दोन प्रतिनिधींनी नड्डा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि आपल्या मागण्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
सीजेपीच्या प्रतिनिधींनी नड्डा यांच्याकडे तीन मागण्यांचे निवेदन सादर केले. सफदरजंग रुग्णालयात असलेले सोनम वांगचुक यांची सुटका करावी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसेच नीट परीक्षेतील पेपरफूट प्रकरणानंतर देशभरात ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची मदत करावी, अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत.
cockroach-janata-party काॅक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी जंतरमंतरवर जात असलेल्या समाजवादी पक्षाच्या खासदार डिम्पल यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. संसदभवनातून जंतरमंतरच्या दिशेने घोषणा देत जात असलेल्या डिम्पल यादव आणि समाजवादी पक्षाच्या अन्य खासदारांना पोलिसांनी मध्येच रोखले आणि ताब्यात घेतले. या दरम्यान डिम्पल यादव यांच्या हाताला दुखापत झाली. मात्र ती नेमकी कशाने झाली, ते समजू शकले नाही. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठीहल्ला आणि पोलिसांची कारवाई लोकशाही विरोधी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे.