पीओपी गणेशमूर्तींची चोरटी आयात थांबावी

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
नागपूर,
ganesh festival 2026  महानगरपालिकेने २०११ मध्ये पीओपी गणेशमूर्तींवर बंदी आणणारा कायदा केला असून, २०१३ मध्ये नगरविकास विभागाने त्याच्या दंडात्मक अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे. तरीही गणेशोत्सव काळात बाहेरून मोठ्या प्रमाणावर पीओपी मूर्ती शहरात छुप्या मार्गाने दाखल होतात. ही चोरटी आयात थांबविण्याची गरज पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघ, राज्य प्रदेशाध्यक्ष सुरेश पाठक यांनी दै. तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली.
 
nagpur ganesh festival 2026 demand to stop illegal import of pop ganesh idols
 
ते म्हणाले, नागपूर शहर व जिल्ह्यात कुठेही पीओपी मूर्ती तयार होत नाहीत. परंतु पेण, जोहा, हमरापूर, कोल्हापूर, अमरावती, आष्टी, आर्वी, यवतमाळ आणि वर्धा आदी भागांतून मागील दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पीओपी मूर्ती शहरात आणल्या जात असून, विविध गोदामांमध्ये त्यांची रंगरंगोटी व सजावट सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला यंदाही हरताळ फासला जाणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
 
 
प्रशासकीय नियंत्रणाचा अभाव
नागपूर हे पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्तींसाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. शहरातील पारंपरिक मूर्तिकारांच्या १८ वस्त्यांमध्ये सुमारे ४५० कुटुंबे गृहउद्योगाच्या माध्यमातून दरवर्षी पाच लाखांहून अधिक मातीच्या मूर्ती तयार करतात. याशिवाय ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर मूर्ती तयार केल्या जातात. शहराची एकूण मागणी सुमारे अडीच लाख मूर्तींची असून, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, तेलंगाणा आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये मूर्ती मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जातात. असे असतानाही स्थानिक बाजारात सुमारे ६० टक्के विक्री पीओपी मूर्तींची होत असल्याचा दावा मूर्तिकारांनी केला आहे.
मूर्तिकारांना फटका, पर्यावरणालाही धोका
पीओपी मूर्तींच्या वाढत्या विक्रीमुळे पारंपरिक मातीच्या मूर्तींना योग्य दर मिळत नसल्याची खंत पाठक यांनी व्यक्त केली. त्यामुळे अनेक मूर्तिकार किरकोळ विक्रीऐवजी घरातूनच घाऊक विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत. दुसरीकडे, पीओपी मूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण वाढत असल्याने पर्यावरणालाही धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.चौकट
 
 
‘हंगामी’ नव्हे, वर्षभर कारवाईची गरज
पाठक यांच्या मते, गणेशोत्सवाच्या तोंडावरच कारवाई करण्याऐवजी महानगरपालिकेने वर्षभर संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून नियमित तपासणी व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बाजारपेठा, गोदामे आणि विक्री केंद्रांची सातत्याने तपासणी करून पीओपी मूर्तींची आयात, साठवणूक व विक्री रोखण्याची मागणी त्यांनी केली आहे.