गयाना,
Passenger boat capsizes at sea in Guyana. दक्षिण अमेरिकेतील गयाना येथे 133 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या 'एमव्ही बारिमा' या प्रवासी बोटीला भीषण अपघात झाला. राजधानी जॉर्जटाउन येथून पोर्ट कैतूमाकडे निघालेली ही बोट पोमेरून नदीजवळ समुद्रात उलटल्याने मोठी खळबळ उडाली. दुर्घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून आतापर्यंत 67 प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. बचावलेल्या प्रवाशांमध्ये 15 मुलांचा समावेश आहे. मात्र, उर्वरित प्रवाशांचा शोध अद्याप सुरू असून मृतांचा अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. गयानाचे पंतप्रधान मार्क फिलिप्स यांनी या दुर्घटनेची माहिती देताना सांगितले की, अपघातानंतर शोध आणि बचाव मोहीम तातडीने सुरू करण्यात आली. सरकारच्या विविध यंत्रणांसह खासगी नौकांचीदेखील मदत घेण्यात येत असून बेपत्ता प्रवाशांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, गयानाचे मंत्री जुआन एडघिल यांनी फेसबुकवरील माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजून 1 मिनिटांनी बोट उलटल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानंतर सरकारी आणि खासगी नौकांच्या मदतीने बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली. अधिकाधिक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू असून या संपूर्ण बचावकार्यात पंतप्रधान मार्क फिलिप्स स्वतः लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोटही समुद्रात उलटली होती. त्या दुर्घटनेत 36 जणांपैकी 15 जणांचा मृत्यू झाला होता, तर 21 जणांची सुटका करण्यात आली होती. त्या घटनेनंतर आता गयानातील या अपघाताने पुन्हा एकदा समुद्री प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.