शिक्षण, न्याय व संविधानिक मूल्यांच्या समर्थनार्थ शांतता रॅली

संविधानाचा जागर करत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
मंगरूळनाथ, 
peace-rally : शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता, परिक्षामधील घोटाळे, पर्यावरण संरक्षण तसेच संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी मंगरूळनाथ शहरात सोमवार २० जुलै शांततापूर्ण व संविधानिक पद्धतीने भव्य शांतता रॅली काढण्यात आली. संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचा जागर करत नागरिक, विद्यार्थी, युवक, महिला आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
 
 
 
jkl
 
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. संविधानाच्या प्रस्ताविकेचे महत्त्व, शिक्षणातील पारदर्शकता, पर्यावरण संवर्धन आणि न्याय व्यवस्थेवरील विश्वास दृढ करण्याचे संदेश देणारे फलक हातात घेऊन सहभागी नागरिकांनी शांततेच्या वातावरणात रॅली काढली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत रॅली तहसील कार्यालयात पोहोचली. यावेळी शिष्टमंडळाने तहसीलदार यांची भेट घेऊन शासनाच्या नावे निवेदन सादर केले. रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सहभागी नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत शांततेचा संदेश दिला. संपूर्ण कार्यक्रम शांततापूर्ण वातावरणात पार पडला. या आंदोलनातून संविधानिक मूल्यांबाबत जनजागृती करण्याबरोबरच शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी करण्याची मागणी करण्यात आली.
 
 
यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी, युवक, महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनानंतर तहसील प्रशासनाने निवेदन स्वीकारून संबंधित मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. या निवेदनावर चंचल खिराडे, चंदा ठाकुर, शोभा जाधव ,विशाखा भगत, लता मनवर, रंजना मनवर, चारूलता इंगोले, सुशिला खाडे, इंदुबाई खडसे, विद्या सोनोने, आशा मनवर, विद्या खिराडे,सुषमा भगत,रुपाली भगत आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.