पावसाळी अधिवेशन फलदायी ठरो!

संसदेत पोहोचताच पंतप्रधान मोदींची अपेक्षा

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
PM Modi's speech at Parliament संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (20 जुलै) संसद भवनात दाखल झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. हे अधिवेशन देशासाठी महत्त्वपूर्ण आणि फलदायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पावसाळा आणि पावसाळी अधिवेशन या दोन्हींची तुलना करत त्यांनी दोन्ही सक्रिय राहिल्यास देशाच्या विकासाला चालना मिळते, असे सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, पावसाळा आणि संसदेचे पावसाळी अधिवेशन दोन्हीही प्रभावीपणे पार पडले, तर त्याचा लाभ संपूर्ण देशाला होतो. त्यामुळे चांगला पाऊस पडावा आणि अधिवेशनही यशस्वी व फलदायी व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.
 
 
PM Modi
 
देशाने गेल्या एका महिन्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगत मोदी यांनी भारतीय नागरिकांनी या यशाचा अभिमान बाळगावा, असे आवाहन केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने महत्त्वपूर्ण टप्पे गाठले असून अंतराळ क्षेत्रातील प्रगतीलाही त्यांनी विशेष अधोरेखित केले. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा उल्लेख करत सांगितले की, गेल्या वर्षी पावसाळ्याच्या काळात एक भारतीय नागरिक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचला होता. तसेच काही दिवसांपूर्वी एका तरुण भारतीय स्टार्टअप कंपनीनेही अंतराळ क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हा केवळ योगायोग नसून भारतीय तरुणांच्या अमर्याद क्षमतेचा आणि मोठ्या स्वप्नांचा संदेश असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून वंदे मातरमशी संबंधित विधेयकासह अनेक महत्त्वाची विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.