मुंबई
priyanka chopra बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आज तिचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष निमित्ताने देश-विदेशातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, तिच्या आगामी ‘वाराणसी’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी खास अंदाजात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्त त्यांनी चित्रपटातील प्रियंकाचा फर्स्ट लूक आणि सेटवरील एक खास बिहाइंड-द-सीन्स छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.
प्रियंका चोप्राच्या वाढदिवसानिमित्त राजामौली आणि ‘वाराणसी’च्या टीमने सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये अभिनेत्रीचा दमदार लूक असलेले नवीन पोस्टर तसेच चित्रपटाच्या सेटवरील यापूर्वी न पाहिलेला एक फोटो चाहत्यांसमोर आणण्यात आला. यासोबतच चित्रपटातील तिच्या ‘मंदाकिनी’ या व्यक्तिरेखेलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
एस.एस. राजामौली यांनी प्रियंकासाठी लिहिलेल्या संदेशात म्हटले, “जेव्हा ती हसते, तेव्हा फक्त नजाकत दिसते. जेव्हा ती हसत नाही, तेव्हा फक्त आग दिसते. ‘वाराणसी’ची मंदाकिनी. प्रियंका चोप्रा.” तर ‘वाराणसी’च्या टीमने आपल्या पोस्टमध्ये, “टीम ‘वाराणसी’कडून आमच्या ‘मंदाकिनी’ अर्थात प्रियंका चोप्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात अशीच नवी साहसे आणि यश सतत येत राहो,” अशा शब्दांत शुभेच्छा व्यक्त केल्या.
‘वाराणसी’मधील प्रियंका चोप्राच्या ‘मंदाकिनी’ या व्यक्तिरेखेची आधीपासूनच मोठी चर्चा सुरू आहे. तिच्या फर्स्ट लूक पोस्टर्सवरून ती चित्रपटात अत्यंत प्रभावी आणि दमदार भूमिका साकारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अभिनेता महेश बाबूसोबत तिची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आणि स्क्रीन प्रेझेन्स पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याचबरोबर एस.एस. राजामौली यांच्या भव्य दिग्दर्शनशैलीमुळे आणि कथनशैलीमुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.
दरम्यान, प्रियंका चोप्राचा ‘वाराणसी’मधील लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या नव्या अवताराचे कौतुक केले असून, काहींनी या लूकवरून तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे. एका नेटकऱ्याने, “प्रियंका चोप्रा तिच्या जंगली मांजरीच्या लूकमध्ये परत आली आहे,” अशी प्रतिक्रिया दिली, तर अनेकांनी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे म्हटले आहे.