अनिल कांबळे,
नागपूर,
property-disputes-murder : संपत्तीच्या कारणावरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाची नातेवाईकांनीच जबर मारहाण करून हत्या केली. अभिषेक गुड्डू धुर्वे (३०, वैष्णोदेवीनगर, कळमना) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांडुरंगनगर परिसरात घडले. या प्रकरणी कळमणा पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन आरोपींना अटक केली आहे.

माहितीनुसार, अभिषेक धुर्वे यांच्या आजीसासू तुलसीबाई गायगुवाल (पांडुरंगनगर, कळमना) यांच्या मालमत्तेवरून त्यांच्या नातेवाईकांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. अभिषेक हा या वादात मध्यस्थी करून नातेवाईकांना सतत समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, रविवारी १०.३०. ते ११ वाजताच्या सुमारास अभिषेक हा त्याची पत्नी आणि इतर नातेवाईकांसह पांडुरंगनगर येथील आजीसासूच्या घरी गेला होता. त्यावेळी शेजारी राहणारे आरोपी नातेवाईक दिनानाथ कल्लुराम निर्मलकर (३२ वर्षे), संतोष गोवर्धन गायगुवाल (५०) आणि लक्ष्मी लालाजी पटेल (५५, सर्व पांडुरंगनगर) यांनी संगनमत करून वाद उकरून काढला. आरोपींनी अभिषेकला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झालेल्या अभिषेकला उपचारासाठी तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मृतकाचा लहान भाऊ सागर गुड्डू धुर्वे (२४, यशोधरानगर) याने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी दिनानाथ निर्मलकर आणि संतोष गायगुवाल या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.