देवळी,
rahul chopda देवळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष राहुल चोपडा यांची महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रासाठी बळीराजा पांदण रस्ते योजनेच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश महसूल विभागाने जारी केला असून ग्रामीण भागातील शेतकर्यांना शेतापर्यंत सर्व ऋतूंमध्ये दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुभवी व कार्यक्षम व्यक्तींना या योजनेत जबाबदारी देण्यात येत आहे. त्याअंतर्गत देवळी विधानसभा क्षेत्रासाठी राहुल चोपडा यांची निवड करण्यात आली आहे.
आमदार राजेश बकाने यांनी सुरुवातीपासूनच बळीराजा पांदण रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ही नियुक्ती झाल्याची भावना व्यक्त होत आहे. शेतकर्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या पांदण रस्त्यांच्या कामांना अधिक गती मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.