कानोसा
ram-janmabhoomi : रामजन्मभूमीवर प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभे राहावे, ही केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील कोट्यवधी रामभक्तांची शतकानुशतके जपलेली इच्छा होती. अनेक पिढ्यांच्या संघर्ष, त्याग आणि प्रतीक्षेनंतर अयोध्येत उभे राहिलेले श्रीराम मंदिर हे भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक बनले आहे.
प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श पती, आदर्श राजा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सत्य व धर्मासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे स्मरण केले जाते. म्हणूनच आजही आपण अभिमानाने म्हणतो-
रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई.
अशा सत्यनिष्ठ परंपरेचे प्रतीक असलेल्या श्रीरामांच्या मंदिराशी संबंधित देणग्यांच्या व्यवस्थापनाबाबत काही अनियमिततेचे आरोप समोर आल्याने अनेक रामभक्तांच्या मनात वेदना निर्माण होणे स्वाभाविक आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित यंत्रणा आणि न्यायव्यवस्था आपले काम करत आहेत. दोषी कोणी असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि निरपराध व्यक्तीवर अन्याय होऊ नये, हीच प्रत्येक रामभक्ताची अपेक्षा आहे.
मात्र या घटनेच्या निमित्ताने काही राजकीय आणि वैचारिक वादही निर्माण झालेत. काहींनी या आरोपांच्या आधारे संपूर्ण राम मंदिर, ट्रस्ट किंवा हिंदू समाजावर प्रश्नचिन्ह उभे करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही एका व्यक्तीच्या किंवा काही व्यक्तींच्या कथित चुकीचा ठपका संपूर्ण संस्थेवर किंवा समाजावर ठेवणे योग्य नाही. वास्तविक पाहता देणगी स्वरूपात आलेली धनराशी मोजणे व त्याचे योग्य व्यवस्थापन करणे याच्याबद्दलचा करार बँक ऑफ इंडिया सोबत झालेला होता. जे लोक अटकेमध्ये आहेत त्यातही त्यांचेच कर्मचारी आहेत. ज्या प्रकारे एखाद्या सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचारामुळे संपूर्ण शासन भ्रष्ट ठरत नाही, त्याचप्रमाणे एखाद्या धार्मिक संस्थेतील कथित अनियमिततेमुळे श्रद्धेचे मूल्य कमी होत नाही. तसेच गैरव्यवहार झाला या घटनेचेही अवमूल्यन व्हायला नको.
या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे, समाजघटकाचे, राजकीय पक्षांचे आणि विविध संघटनांचे काही ना काही हितसंबंध असतात. अनेकदा त्या हितसंबंधांच्या दृष्टीनेच त्यांची भूमिका निश्चित होत असते. राम मंदिराच्या प्रश्नातही हेच चित्र दिसून आले. काही राजकीय नेत्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती लावली, तर काहींनी त्यापासून जाणीवपूर्वक दूर राहण्याचा निर्णय घेतला. काहींनी या कार्यक्रमावर टीका केली, तर काहींनी त्याचे मनापासून स्वागत केले. काहींना राम मंदिराची उभारणीच मान्य नव्हती; काहींनी त्या जागेचा इस्पितळासारख्या अन्य कारणांसाठी उपयोग व्हावा, अशी भूमिका मांडली. तर काहींच्या राजकीय भूमिकेवरून असे जाणवले की, हा प्रश्न कायम प्रलंबित राहिला असता तर त्यातून त्यांना राजकीय लाभ मिळाला असता.
लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे; परंतु श्रद्धा, न्यायालयाचा निर्णय आणि जनभावना या तिन्हींचा सन्मान राखणे हेही तितकेच आवश्यक आहे. मतभेद असू शकतात, परंतु राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर मतभिन्नतेचे रूपांतर वैमनस्यात होऊ नये. कारण मंदिर असो वा इतर कोणताही राष्ट्रीय विषय, त्याकडे केवळ राजकीय चष्म्यातून न पाहता सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातूनही पाहणे गरजेचे आहे.
काही लोकांनी राम मंदिराच्या निर्माणाला मोदींचा किंवा भाजपाचा विजय मानले. राम मंदिर हे जागतिक आस्थेचे केंद्र आहे या सत्यतेची त्यांच्या मनाला पुसटशी जाणीवही कधी झाली नाही. राम मंदिर हा त्यांच्यासाठी संघ परिवाराचा मुद्दा होता. ज्या वेळेला राम मंदिरासाठी संपूर्ण देशभरातून एक एक रुपया गोळा करण्यात आला त्याही वेळेला तो पैसा कुठे गेला, त्याचे काय झाले असे प्रश्न विचारणारे होते. असे प्रश्न विचारणाऱ्यांचा त्याही वेळचा उद्देश पैशांचा हिशेब विचारणे हा नव्हता तर संघ परिवाराला बदनाम कसे करता येईल हाच त्यांचा मुख्य उद्देश होता.
प्रभू श्रीरामांवर श्रद्धा असलेला सामान्य माणूस कालही आपल्या कष्टाच्या कमाईतील काही भाग मंदिरासाठी अर्पण करत होता आणि आजही करतो. तो दान करताना व्यवहार करत नाही; तो श्रद्धा व्यक्त करत असतो. त्या श्रद्धेचे संरक्षण करणे ही ट्रस्ट, व्यवस्थापन आणि समाज या सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे.
लहानपणी आपण मंदिरात देवासमोर पैसे ठेवत असू. तेव्हा मनात प्रश्न यायचा की, हा पैसा कोणी घेऊन गेला तर? घरातील ज्येष्ठ मंडळी सांगायची, तो पैसा आता देवाला अर्पण झाला आहे; तो तुझा राहिलेला नाही. या एका संस्कारातून श्रद्धेचे तत्त्व समजते. परंतु श्रद्धेचा गैरफायदा घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. उलट, श्रद्धेमुळेच व्यवस्थापन अधिक पारदर्शक, अधिक प्रामाणिक आणि अधिक जबाबदार असले पाहिजे.
जेव्हा हा वाद उभा राहिला, तेव्हा समाजातील अनेक जण पुढे आले. त्यांनी आपण राम मंदिरासाठी दान दिलेल्या वस्तूंची नावे आणि यादी जाहीरपणे सांगितली. आम्ही हे दिले होते, आम्ही ते दिले होते, असे अनेकांनी सांगितले. परंतु सनातन धर्मानुसार दानाचे आदर्श तत्त्व असे आहे की, दान दिल्यानंतर आपण काय दिले याचे स्मरणही राहू नये. इतकेच नव्हे, तर मी दान दिले आहे हा अहंभावसुद्धा मनात राहू नये. निःस्वार्थ भावनेने, कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता केलेले दान हेच सनातन धर्माने श्रेष्ठ मानले आहे.
आज आवश्यकता आहे ती दोन गोष्टींची, एक श्रद्धेचे दृढीकरण आणि दुसरे म्हणजे व्यवस्थेचे शुद्धीकरण. श्रद्धा अबाधित राहिली पाहिजे आणि व्यवस्थेतील त्रुटी निर्धाराने दूर केल्या पाहिजेत. राम मंदिर हे केवळ दगडांचे बांधकाम नाही; ते कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचे, संघर्षाचे आणि सांस्कृतिक स्मृतींचे प्रतीक आहे. त्यामुळे मंदिराची प्रतिष्ठा जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे; पण त्याच वेळी कोणत्याही अप्रमाणित आरोपांच्या आधारे संपूर्ण मंदिर किंवा संपूर्ण श्रद्धेला बदनाम करण्याचाही प्रयत्न होऊ नये.
प्रभू श्रीरामांनी आपल्या जीवनातून सत्य, न्याय, मर्यादा आणि उत्तरदायित्वाचा आदर्श घालून दिला. त्या आदर्शांनुसारच मंदिर व्यवस्थापनानेही स्वतःला अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकविश्वासास पात्र बनविले, तर ही घटना भविष्यासाठी एक महत्त्वाचा धडा ठरेल.
अमोल पुसदकर