वाढीव वीज बिलाचे मूळ कारण विक्रमी वापर-'स्मार्ट मीटर' नव्हे

महावितरणची स्पष्टोक्ती

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
नागपूर,
electricity bill गेल्या काही दिवसांपासून नागपूरमधील अनेक वीज ग्राहकांकडून वाढीव वीज बिलांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. काही ग्राहकांकडून या वाढीव बिलांचे खापर 'स्मार्ट मीटर'वर फोडले जात आहे. मात्र, या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, महावितरणने यामागील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.
 

electricity bill 
 
 
 
नागपूरने उन्हाळ्यात अत्यंत भीषण उष्णतेचा सामना केला. घरातील सर्व सदस्य दिवसभर घरी होते, ज्याचा थेट परिणाम दैनंदिन वीज वापराच्या प्रमाणावर झाला आहे. अद्यापही म्हणावा तसा पाऊस न झाल्याने वातावरणात उष्मा कायमच आहे. जेव्हा तापमान अचानक वाढते, तेव्हा घरातील वातानुकूलित यंत्रणा (एसी), कूलर व रेफ्रिजरेटर यांना आतील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक वेगाने व जास्त वेळ काम करावे लागते. बाहेरील उष्णता जितकी जास्त, तितका अधिक वीज वापर या उपकरणांकडून केला जातो. सध्या शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगचा वापर वाढला आहे. घरातील उपकरणांचा अवाजवी वापरही वीज बिल वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. विशेष म्हणजे, ज्या प्रमाणात वीज युनिट्सचा वापर वाढतो, त्यानुसार वीज दराचे स्लॅबही बदलतात, परिणामी बिलाची रक्कम वाढल्याचे दिसून येते.
महावितरणचे स्मार्ट मीटर हे केवळ ग्राहकाने वापरलेल्या प्रत्यक्ष विजेची नोंद करण्यासाठी बनवलेले आहे. ते रीडिंग फुगवून सांगत नाहीत. तुमचे बिल जास्त आले असेल, तर ग्राहकांनी आपल्या वापराच्या युनिट्सची मागील वर्षाच्या याच कालावधीतील बिलांशी तुलना करावी, त्यात वाढ झालेली दिसून येईल. स्मार्ट मीटरच्या सुविधेमुळे ग्राहक दररोज किंवा दर तासाला आपल्या वीज वापराचा मागोवा घेऊन पारदर्शकता तपासू शकतात.
वैयक्तिक प्रयत्नांसोबतच आपण दीर्घकालीन विचार करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त वृक्षारोपण केल्याने तापमान कमी होण्यास, हवा शुद्ध राहण्यास व भविष्यातील पिढीला राहण्यायोग्य नागपूर मिळण्यास मदत होईल.electricity bill तरीही, बिलाबाबत काही शंका असल्यास ग्राहकांनी आपल्या जवळच्या महावितरण ग्राहक सेवा केंद्राला भेट द्यावी किंवा ऑनलाईन साधनांचा वापर करून आपल्या वापराचा तपशील तपासावा. स्मार्ट मीटर हे आपल्याला केवळ आपण वापरलेल्या विजेचेच बिल देण्याची खात्री देतात, असे महावितरण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेे आहे.
अशी करा वीज बचत
वाढत्या उष्म्यात एसीचे तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअसवर सेट करा, शक्य असल्यास एसीसोबत पंख्याचा वापर करा, दिवसा घराच्या खिडक्या व पडदे बंद ठेवा. कूलर-एसीची नियमित सर्व्हिसिंग करा. सौर ऊर्जा उपकरणांचा वापर करताना आपल्या दैनंदिन वापराचे नियोजन करणे फायदेशीर ठरेल.