दिल्ली आंदोलनाचे वर्धेत पडसाद

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
वर्धा,
delhi-protest : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सोमवार २० रोजी त्या आंदोलनाचे वर्धा जिल्ह्यातही पडसाद उमटले. वर्धा, पुलगाव, आर्वी, हिंगणघाट येथेही विद्याथ्र्यांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून सरकारचा निषेध नोंदविला.
 
 
 jhk
 
 
 
नीट व टीईटी पेपर फुटी प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी सरकार दडपशाहीचा वापर करीत असल्याचा आरोप होत असून याचा निषेध व आंदोलनाला पाठिंबा दर्शवून राकाँ शप गटाच्या वतीने जिल्हा राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी कार्यकारिणीच्या वतीने स्थानिक महात्मा गांधी चौकात ११ ते १ पर्यंत धरणे आंदोलन तसेच जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवक प्रदेश उपाध्यक्ष संदीप किटे, युवक कार्याध्यक्ष सचिन पार्सडे, जिल्हाध्यक्ष प्रणय येवले, नगरसेवक मुन्ना झाडे, प्रशांत कुत्तरमारे, प्रवीण पेठे, आकाश दाते, डॉ. माधवी पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, दुपारी ४ वाजता शहरातील काँक्रोच जनता पार्टीने शिवाजी चौकातून सरकारविरुद्ध घोषणाबाजी करीत मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
 
पुलगावात शांती मार्च
 
 
पुलगाव : नीट परीक्षा पेपरफुटी, परीक्षांमधील गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या अनियमिततेबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी पुलगाव येथे शांती मार्च काढण्यात आला. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकत्र्यांनी केली.