वॉशिंग्टन,
Rodri named best player of the World Cup फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करत 16 वर्षांनंतर दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात अखेरच्या क्षणी झालेल्या गोलमुळे स्पेनने अर्जेंटिनाचे सलग दुसरे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंग केले. या विजयानंतर स्पेनचा कर्णधार रॉड्री याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गोल्डन बॉल पुरस्काराने गौरविण्यात आले.स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा गोल्डन बूट पुरस्कार फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेने आपल्या नावावर केला. त्याने संपूर्ण स्पर्धेत 10 गोल केले आणि सलग दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल्डन बूट जिंकणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला.
सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार स्पेनच्या उनाई सिमॉनला मिळाला. स्पेनने संपूर्ण स्पर्धेत आठ सामने खेळताना केवळ एकच गोल स्वीकारला. स्पेनच्याच पाऊ कुबारासीने सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार जिंकत संघातील सहकारी लॅमिन यामालला मागे टाकले. सेंटर-बॅक म्हणून खेळणाऱ्या कुबारासीच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत त्याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. फेअर प्ले पुरस्कार नेदरलँड्स संघाला देण्यात आला.फिफा विश्वचषक 2026 मधील पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत. सर्वोत्तम खेळाडूचा गोल्डन बॉल पुरस्कार रॉड्री (स्पेन), सर्वाधिक 10 गोलांसाठी गोल्डन बूट किलियन एम्बाप्पे (फ्रान्स), सर्वोत्तम गोलरक्षकाचा गोल्डन ग्लोव्ह उनाई सिमॉन (स्पेन), सर्वोत्तम युवा खेळाडू पाऊ कुबारासी (स्पेन) आणि फेअर प्ले पुरस्कार नेदरलँड्स संघाला मिळाला.
अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीसमोर अंतिम सामन्यात गोल्डन बूट जिंकण्याची संधी होती. त्यासाठी त्याला किमान दोन गोल करण्याची आवश्यकता होती. मात्र, अंतिम सामन्यात तो एकही गोल करू शकला नाही. यापूर्वी दोन वेळा गोल्डन बॉल जिंकलेल्या मेस्सीला यावेळी तिसऱ्यांदा हा मान मिळवण्यातही अपयश आले. मँचेस्टर सिटीचा मिडफिल्डर रॉड्रीने संपूर्ण स्पर्धेत एकही गोल केला नसला, तरी मिडफिल्डमधील त्याचे अचूक पासिंग, चेंडूवरील नियंत्रण आणि खेळावरील प्रभाव स्पेनच्या विजेतेपदात निर्णायक ठरला. या कामगिरीमुळे त्याला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गोल्डन बॉल पुरस्कार देण्यात आला. तसेच चॅम्पियन्स लीग, बॅलोन डी'ओर आणि विश्वचषक जिंकणारा तो इतिहासातील 11वा पुरुष फुटबॉलपटू ठरला.