चिमुकलीच्या न्यायासाठी मोर्चा अन् महिला अधिकार्यांचा अपमान!

कराळे मास्तरची जीभ पुन्हा सटकली

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
wardha-news : वर्धेत घडलेली घटना प्रचंड चीड आणणारीच होती. त्या घटनेविरोधात आंदोलन होणे अपेक्षित होते. आरोपीला शिक्षा आणि चिमुकलीला न्याय या न्याय मागणीसाठी वर्धेकर एकवटले. एका चिमुकलीच्या न्यायासाठी रस्त्यावर आलेल्यांपैकी कराळे मास्तर यांची जीभ सटकली आणि त्यांनी महिला जिल्हाधिकार्यांविषयी केलेले वक्तव्य वर्धेची संस्कृती नव्हे असेच म्हणावे लागेल.
 
 
wardha
 
 
 
एखाद्या प्रशासकीय अधिकार्याच्या निर्णयावर किंवा अनुपस्थितीवर टीका करण्याचा अधिकार आहे. वर्धेच्या जिल्हाधिकार्यांविषयी कराळे यांनी केलेले वक्तव्य हे प्रशासकीय भूमिकेसोबतच त्यांच्या महिला असण्यावर अधिक भाष्य करणारे आहे. निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः उपस्थित राहाव्यात, अशी मागणी असू शकते. मात्र, त्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘साडी नेसून’ उपस्थित राहिल्याचा उल्लेख करून केलेली टीका ही व्यक्तिकेंद्री आणि महिला अधिकार्यांच्या सन्मानाला ठेच पोहोचवणारी ठरते.
 
 
आज विविध क्षेत्रांत महिला अधिकारी सक्षमपणे नेतृत्व करत आहेत. त्यांच्याविषयी बोलताना सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी अधिक जबाबदारीने आणि सन्मानाने भाषा वापरणे अपेक्षित आहे. मतभेद असू शकतात, आंदोलनही होऊ शकते. परंतु, त्यासाठी महिलांचा अवमान होईल अशी टीका वर्धेच्या संस्कृतीला शोभणारी नाही. एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी यांच्या आई त्यांच्यासोबतच राहत नाहीत, असा दावा केला. जिल्हाधिकारी कार्यालय भाजपाचे कार्यालय अशी पाटी लावा, असा सल्लाही त्यांनी दिला. कराळे कायम भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करतात.
 
 
त्यांच्या या टीकेला लाइक्सही मिळतात. ते एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेश प्रवक्ते होते. त्यांनी पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवली. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा मोठी आहे. राजकारणात टीका होत राहतात. पण, महिला अधिकार्याची साडी हा विषयी जिव्हारी लागणारा ठरला. आता सध्या जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार त्यांना नसल्याने त्यांनी ‘कॉक्रोच’ संघटनेला डोक्यावर घेतले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्यासोबत संपर्क केला असता त्या म्हणाल्या की माझी आई आजारी असल्याने मी त्या दिवशी कार्यालयात निवेदन स्वीकारण्यासाठी येऊ शकले नाही. निवेदन देण्यासाठी येणार असल्याची कोणतीही पूर्वसचना नसल्याने आपण कार्यालयात उपस्थित राहू शकलो नाही. त्याहीनंतर आपण उपजिल्हाधिकार्यांना कार्यालयात निवेदन स्वीकारण्यासाठी पाठवले होते. आपली आई आपल्यासोबतच राहत असल्याची त्यांनी आवर्जून सांगितले. रोठा येथील प्रकारणासंदर्भात आम्ही शासन आणि प्रशासन म्हणून आढावा घेत आहोत. या विषयात शासनही संवेदन असल्याचे त्यांनी सांगितले.