सलमान खानच्या प्रकृतीची चर्चांना उधाण

व्हायरल व्हिडीओनंतर अभिनेत्याची क्रिप्टिक पोस्ट

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
मुंबई
salman khan  बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्याच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री सलमानने मुंबईतील स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीच्या नव्याने उभारण्यात आलेल्या ‘डेटा कलेक्शन अँड व्हेरिफिकेशन सपोर्ट सेंटर’च्या उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमादरम्यान पापाराझींनी टिपलेला त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये सलमान अत्यंत थकलेला आणि अस्वस्थ दिसत असल्याचे अनेकांनी नमूद केले. आपल्या फिटनेस आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता यावेळी नेहमीपेक्षा खूपच खंगलेला दिसत असल्याची चर्चा रंगली. परिणामी, सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत विविध प्रश्न उपस्थित केले.
 

salman khan health sparks concern after viral video shares cryptic instagram post 
या चर्चांदरम्यान सलमान खानने रविवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट करत अप्रत्यक्षपणे या चर्चांवर प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने, “तुम्हा लोकांची तब्येत कशी आहे?” असे लिहिले. व्हायरल व्हिडीओनंतर आलेली ही पोस्ट आता सोशल मीडियावर विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. कार्यक्रमातील व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्याच्या दिसण्याबाबत चिंता व्यक्त केली होती. “सलमानची तब्येत बरी दिसत नाही,” अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली होती, तर “सलमानला काहीतरी झालंय,” असे दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले होते.
याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चर्चांवर आणि व्हिडीओंवर सलमान खानने पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. मे महिन्यात मुंबईतील माहीम येथील हिंदुजा रुग्णालयातून बाहेर पडताना पापाराझींनी त्याला पाहिले होते. तो तेथे एका जवळच्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. रुग्णालयातून बाहेर पडून आपल्या वाहनाकडे जात असताना पापाराझींनी त्याला घेरले आणि त्याच्या चेहऱ्यावर कॅमेऱ्यांचे फ्लॅशलाइट्स चमकवले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सलमानने पापाराझींना खडसावले होते. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत, “जर तुम्हाला माझ्या नुकसानीतून पैसे कमवायचे असतील, तर गप्प बसा.. चेष्टा करू नका. भाई भाई मातृभूमी.. भाई पिक्चर.. भाई हे… भाई ते.. चित्रपट महत्त्वाचा आहे की आयुष्य?” असे लिहिले होते.
 
 
दरम्यान, सलमान खान salman khan लवकरच ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे आधीचे नाव ‘बॅटल ऑफ गलवान’ असे होते. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री चित्रांगदा सिंहही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. २०२० मध्ये भारताच्या लडाखमधील वादग्रस्त सीमावर्ती गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर हा चित्रपट आधारित आहे.