आंदोलनाला वेग शबाना आझमी, प्रकाश राज, पूनम पांडे यांचा पाठिंबा

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
मुंबई
cjp protest at jantar mantar संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार, २० जुलैपासून सुरू होत असून ते १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर CJP (कॉकरोच जनता पार्टी)ने मोर्चाची तयारी सुरू केली असून, २० जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चासाठी मोठ्या संख्येने नागरिक जंतर-मंतर येथे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दिवसभरात या गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

shabana azmi prakash raj and poonam pandey support cjp protest at jantar mantar 
मोर्चापूर्वी रविवारी CJPच्या आंदोलनाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पाठिंबा दर्शवला. अभिनेत्री शबाना आझमी आणि अभिनेते प्रकाश राज यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री पूनम पांडे हिनेही CJPच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. यावेळी ती म्हणाली, “मला राजकारणाबद्दल काहीही माहिती नाही. पण हे विद्यार्थ्यांसाठी आहे. राजकारण किंवा कोणत्या धर्मासाठी नाही…,” असे सांगत तिने सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही समर्थन व्यक्त केले. दुसरीकडे, प्रकाश राज यांनीही CJPला जाहीर पाठिंबा देत लक्षवेधी वक्तव्य केले.
शबाना आझमी यांनी आंदोलनस्थळी उपस्थित आंदोलनकर्त्यांचे प्रेमाने अभिवादन केले. CJPकडून त्यांच्या भेटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून, त्यामध्ये प्रकाश राजही आंदोलनकर्त्यांना अभिवादन करताना दिसतात. प्रकाश राज यांनी काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत त्यांना पाठिंबा दर्शवला, तर शबाना आझमी यांनी मंचावरून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन व्यक्त केले.
प्रकाश राज दुसऱ्यांदा जंतर-मंतर येथे पोहोचले आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. “आज रात्री मी तुमच्यासोबत आहे… मी येथेच आहे. पाहतो काय होतं ते…,” असे ते आपल्या भाषणात म्हणाले. याशिवाय, त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत, “आपल्या देशातील तरुण आता प्रश्न विचारत आहे. हे तरुण एकाच उद्देशाने एकत्र आले आहेत आणि लढत आहेत…,” असेही म्हटले. दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनीही जंतर-मंतर येथे भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला.
CJPचे जंतर-मंतरवरील आंदोलन ६ जूनपासून सुरू असून, या आंदोलनाद्वारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, सोनम वांगचुक हे २८ जूनपासून उपोषणावर आहेत. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी शनिवारी त्यांना आंदोलनस्थळावरून ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.