मुंबई
shreyas talpade बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे गेली दोन दशके चित्रपटसृष्टीत सक्रिय असून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम टु द जंगल’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला असून, त्यामधील श्रेयसच्या भूमिकेचेही प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. मात्र, याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान डिसेंबर २०२३ मध्ये त्याच्या आयुष्यात एक गंभीर घटना घडली होती. त्याला कार्डियक अरेस्ट आला होता आणि त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रसंगाची आठवण सांगताना श्रेयसने, “१० मिनिटे माझे हृदय बंद पडले होते,” असा धक्कादायक खुलासा केला आहे.
‘वेलकम टु द जंगल’च्या चित्रीकरणादरम्यान २०२३ मध्ये श्रेयस तळपदे यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची पत्नी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना ते बेशुद्ध झाले होते. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करून त्यांना शुद्धीवर आणले. त्यानंतर त्यांच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात आली.
अलिकडेच ‘कर्ली टेल्स’च्या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस तळपदे यांनी या संपूर्ण घटनेचा पुन्हा एकदा उल्लेख केला. “हे माझं दुसरं आयुष्य आहे,” असे सांगत त्यांनी या प्रसंगानंतर आपल्या जीवनशैलीत मोठे बदल केल्याचे नमूद केले. त्यांच्या मते, तो काळ त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण आणि धक्कादायक होता.
या अनुभवाबद्दल बोलताना श्रेयस म्हणाले, “त्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. याआधी मी केवळ कामालाच सर्वाधिक महत्त्व देत होतो. माझ्यासाठी माझं कामच सर्वकाही होतं. मला सतत काम करायचं होतं आणि त्याचबरोबर कुटुंबालाही दर्जेदार वेळ द्यायचा होता. मात्र, त्या एका क्षणात सर्व काही बदललं. त्या १० मिनिटांत मी तांत्रिकदृष्ट्या मृत होतो. माझ्या हृदयाचे ठोके तब्बल दहा मिनिटांसाठी बंद झाले होते. डॉक्टरांना मला पुन्हा जीवदान द्यावं लागलं. चित्रपटांमध्ये जसं दाखवलं जातं, तसं त्यांनी मला सीपीआर दिला आणि त्यानंतर इलेक्ट्रिक शॉक देऊन माझं हृदय पुन्हा सुरू केलं.”
श्रेयस यांनी पुढे सांगितले की, त्यांना कार्डियक अरेस्ट त्यांच्या गाडीत आला होता. त्या वेळी त्यांच्या पत्नीने प्रसंगावधान राखत त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने ते रुग्णालयाच्या अगदी जवळ असल्याने त्यांच्यावर तात्काळ उपचार आणि शस्त्रक्रिया करता आली. या संपूर्ण अनुभवाने त्यांना आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकल्याचे त्यांनी सांगितले. “काम हेच जीवनातील सर्वकाही नसतं,” याची जाणीव या प्रसंगाने करून दिली असून, आता आपण आपल्या कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवण्याला प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.