खेळाडूंच्या फिटनेसवर शुभमन गिल संतापला

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
लॉर्ड्स,
Shubman furious over players' fitness लॉर्ड्स येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारताचा 27 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने संघातील खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मालिकेदरम्यान सतत झालेल्या दुखापतींमुळे संघाची आखणी विस्कळीत झाल्याचे सांगत, भविष्यात यावर गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे त्याने स्पष्ट केले.संपूर्ण मालिकेत भारताला दुखापतींचा मोठा फटका बसला. अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि त्याचा बदली खेळाडू नितीश कुमार रेड्डी हे मालिका सुरू होण्यापूर्वीच दुखापतग्रस्त झाले होते. त्यानंतर हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही दौऱ्यादरम्यान दुखापतींना सामोरे जावे लागले. दुसऱ्या सामन्यात गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अंतिम सामन्यात खेळू शकला नाही. त्यामुळे सुरुवातीच्या संघातील किमान पाच खेळाडू अंतिम लढतीत अनुपस्थित होते.
 

Shubman furious over players 
सामन्यानंतर बोलताना शुभमन गिल म्हणाला की, एक किंवा दोन खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त होत असतील तर संघाचे नियोजन कोलमडते. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापनाला इच्छेविरुद्ध सतत वेगवेगळी संयोजने वापरावी लागतात. त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले की, विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत सलग 11 सामने खेळावे लागतात, मात्र येथे खेळाडू दोन किंवा तीन सामन्यांची मालिका देखील पूर्ण करू शकत नाहीत, ही चिंतेची बाब आहे.गिलने सांगितले की, सामन्याच्या दिवशी एखादा खेळाडू स्नायू ताणल्याचे सांगतो, तेव्हा अखेरच्या क्षणी संपूर्ण रणनीती बदलावी लागते. पूर्णपणे तंदुरुस्त नसलेल्या खेळाडूला मैदानात उतरवणे संघासाठी धोकादायक ठरू शकते, कारण तो सामना अर्धवट सोडून बाहेर पडल्यास त्याचा थेट फटका संघाला बसतो. त्यामुळे भविष्यात सातत्यपूर्ण यश मिळवायचे असेल, तर प्रत्येक खेळाडूने आपल्या तंदुरुस्तीवर अधिक भर दिला पाहिजे, असेही त्याने नमूद केले. विशेष म्हणजे, शुभमन गिल स्वतःही या मालिकेत पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. बर्मिंगहॅममध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात तो 80 धावांवर फलंदाजी करत असताना स्नायूंच्या पेटक्यांमुळे मैदानाबाहेर गेला होता. लॉर्ड्समधील अंतिम सामन्यातही त्याला पेटके आले आणि तो 77 धावांवर बाद झाला. भारताच्या डावात रोहित शर्माने 138 धावांची शानदार खेळी केली, तर विराट कोहलीने 74 धावांचे योगदान दिले. मात्र, या प्रयत्नांनंतरही भारताला मालिका वाचवता आली नाही.