सोनम वांगचुक व अभिजित दीपकेंच्या समर्थनार्थ गोंदियात एल्गार!

- प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून केंद्र शासनाच्या निषेध

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
गोंदिया, 
gondia-news : शिक्षणव्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या भविष्याची सुरक्षितता आणि लोकशाही मार्गाने संवादाची अपेक्षा या मुद्यांवर गोंदियात सोमवार 20 जुलै रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शिक्षण बचाव समन्वय समिती आणि विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आंदोलनात शिक्षणविषयक प्रश्नांवर आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक व अभिजीत दीपके यांच्या समर्थनार्थ एल्गार करण्यात आला. तसेच नीट परीक्षेतील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
 
 
 
gondia-news
 
 
 
यावेळी आंदोलनात नगराध्यक्ष सचिन शेंडे, उबाठा जिल्हाप्रमुख पंकज यादव, नगरसेवक सुनील भालेराव, हरीश तुळसकर, योगेश अग्रवाल, आंदोलन समितीचे अतुल सतदेवे यांच्यासह संविधान मैत्री संघाचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, युवक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, स्थानिक प्रशासकीय इमारतीसमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात हातात राष्ट्रध्वज आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या संरक्षणाची मागणी करणारे फलक घेत शेकडो युवक सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढत केंद्र सरकारच्या धोरणांचे निषेध नोंदविले. प्रसंगी शिक्षणासारख्या संवेदनशील विषयाकडे केवळ प्रशासकीय किंवा कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून न पाहता राष्ट्रहिताच्या व्यापक चौकटीत विचार करण्याची गरज वक्त्यांनी स्पष्ट करीत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना निवेदन सादर करण्यात आले. सादर निवेदनानुसार सोनम वांगचुक व अभिजीत दीपके यांच्या आरोग्य व सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, केंद्र सरकारने त्यांच्या प्रतिनिधींशी तातडीने सकारात्मक संवाद सुरू करावा, शिक्षण व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित मागण्यांवर गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, तसेच शांततामय लोकशाही आंदोलनांबाबत संविधानसम्मत आणि संवेदनशील भूमिका स्वीकारावी, अशी मागणी करण्यात आली.
 
 
गोरेगावात मोर्चा ...
 
 
येथील शिक्षण बचाव समन्वय समितीच्या माध्यमातून स्थानिक युवकांनी सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या समर्थनात बसस्थानक चौक येथून मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. मोर्चात राजधर रामटेके, सैलेश जांभूळकर, भुमेश ठाकरे, प्रणय राऊत, के. एन. मेश्राम, मिनल राऊत यांच्यासह शहरातील अनेक युवक सहभागी झाले होते.