विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला वेग

न.प. मुख्याधिकार्‍यांकडून केंद्रांची पाहणी

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
मानोरा,
inspection-of-centers : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत नगरपंचायतचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उमेश राठोड यांनी शहर व परिसरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. या मोहिमेचा भाग म्हणून राठोड यांनी सोयजना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रा ला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत संबंधित केंद्राचे बीएलओ, पर्यवेक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
 
 
 
j
 
 
 
मुख्याधिकार्‍यांनी बीएलओंकडून घर भेटी, नमुना ६,७ आणि ८ भरून घेण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला व कागदपत्रांची तपासणी केली. १ जानेवारी २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण करणार्‍या तरुण-तरुणींची नाव नोंदणी, मयत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, नाव, पत्ता, फोटो व इतर दुरुस्त्या करण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली जात आहे. एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक घरी भेट देऊन खातरजमा करा, अशा सूचना मुख्याधिकार्‍यांनी बीएलओंना दिल्या.
 
 
पाहणीदरम्यान त्यांनी मतदान केंद्रावर रॅम्प, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह यासारख्या किमान आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, याचीही खात्री केली. मतदार याद्या अद्ययावत व त्रुटीविरहित करण्यासाठी काटेकोरपणे काम करण्याचे आदेश देण्यात आले. ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत नाही, त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करून नोंदणी करावी. तसेच दुरुस्तीसाठी बीएलओंशी संपर्क साधावा असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.