त्रिपुराचे डीजीपी अनुराग धनखड यांचा संशयास्पद मृत्यू

पोलीस मुख्यालयात मृतदेह आढळला

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
अगरतळा,
Suspicious death of DGP Anurag Dhankhad त्रिपुराचे पोलीस महासंचालक (डीजीपी) अनुराग धनखड यांचा मृतदेह अगरतळा येथील पोलीस मुख्यालयातील त्यांच्या दालनात संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह प्रशासकीय वर्तुळातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.प्राथमिक माहितीनुसार, अनुराग धनखड यांचा मृतदेह त्यांच्या केबिनमध्ये आढळल्यानंतर त्यांना तातडीने अगरतळा येथील गोविंद बल्लभ पंत (GBP) रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरुवातीच्या माहितीनुसार आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी अधिकृत स्तरावर याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
 
 
 
gt767
अनुराग धनखड हे १९९४ बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी होते. २०२५ मध्ये त्यांची त्रिपुराच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. आपल्या सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवले.सीबीआयमध्ये कार्यरत असताना अनुराग धनखड यांनी देशातील गाजलेल्या नीरव मोदी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व केले होते. तसेच १९८४ मधील शीखविरोधी दंगलींच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) नेतृत्वही त्यांनी केले होते. कर्तव्यदक्ष आणि अनुभवी अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे पोलीस दलात शोककळा पसरली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.