मुंबई
maharashtra tiger महाराष्ट्रातील वनक्षेत्रांमधून वन्यजीवप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. सन २०२६ च्या अखिल भारतीय व्याघ्रगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार, राज्यातील जंगलांमध्ये वाघांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
वनविभागाने वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, महाराष्ट्रातील वाघांची एकूण संख्या आता ६०० ते ६२५ च्या दरम्यान पोहोचली आहे. जरी या गणनेचा अंतिम आणि अधिकृत अहवाल जुलै २०२७ मध्ये प्रसिद्ध होणार असला, तरी या प्राथमिक आकडेवारीने राज्यातील व्याघ्रसंवर्धनाच्या प्रयत्नांना मोठे बळ दिले आहे. यापूर्वी सन २०२२ मध्ये झालेल्या व्याघ्रगणनेत महाराष्ट्रात केवळ ४४४ वाघांची नोंद झाली होती, ज्यामध्ये गेल्या चार वर्षांत लक्षणीय भर पडली आहे.
ताडोबा स्थिर, तर मेळघाटची विक्रमी झेप
maharashtra tigerराज्यात सर्वाधिक वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांची संख्या यंदा फारशी वाढलेली नसून ती १०० च्या आसपास स्थिर राहण्याचा अंदाज आहे, तर २०२२ मध्ये येथे ८१ ते ८७ वाघ नोंदवले गेले होते. याउलट, मेळघाट व्याघ्रप्रकल्पाने संवर्धनात सर्वात मोठी कामगिरी करून दाखवली आहे. मेळघाटमध्ये २०२२ साली वाघांची संख्या सुमारे ५० ते ६० इतकी होती, जी यंदा जवळपास दुप्पट होऊन ९० ते १०० पर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. यामुळे आता विदर्भातील व्याघ्रसंवर्धनाच्या नकाशावर ताडोबासोबतच मेळघाटचे नावही ठळकपणे समोर आले आहे.
विदर्भातील विविध क्षेत्रांमधील वाघांची आकडेवारी
maharashtra tiger विदर्भातील अनेक व्याघ्रप्रकल्प, प्रादेशिक वनक्षेत्रे आणि वनविकास महामंडळाच्या भागात वाघांचा वावर वाढल्याचे दिसून आले आहे. विविध वनक्षेत्रांमधील वाघांची अंदाजित संख्या पुढीलप्रमाणे आहे:
- गडचिरोली जिल्हा: पूर्वीच्या २२-२३ वरून ही संख्या आता सुमारे ४० झाली आहे.
- ब्रह्मपुरी वनक्षेत्र: या भागात सध्या सुमारे ७० वाघांची नोंद करण्यात आली आहे.
- नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प: येथे वाघांची संख्या २० ते २५ च्या दरम्यान पोहोचली आहे.
- नागपूर जिल्हा पट्टा: पेंच व्याघ्रप्रकल्प, उमरेड-र्कहांडला अभयारण्य आणि प्रादेशिक वनक्षेत्र मिळून जवळपास 50 वाघ आहेत.
- उमरेड-र्कहांडला परिसर: २०२२ मधील केवळ ६ वाघांवरून ही संख्या आता १७ ते १८ वर पोहोचली आहे.
- पेंच व्याघ्रप्रकल्प: येथील वाघांची संख्या ४० ते ४५ या पातळीवर स्थिर आहे.
- बोर व्याघ्रप्रकल्प: या क्षेत्रात ८ ते १० वाघांची नोंद झाली आहे.
- भंडारा-गोंदिया जिल्हा: या दोन्ही जिल्ह्यांत मिळून सुमारे १५ वाघ आढळले आहेत.