ठाकरे गटाच्या आयोजकांवर तीन गुन्हे दाखल

परवानगी नसल्याचा पोलिसांचा दावा

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
मुंबई
uddhav thackeray मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या CJP (कॉकरोच जनता पार्टी)च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घेतलेल्या सभेप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. विनापरवानगी सभा आयोजित करणे, आंदोलनासाठी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करणे आणि आंदोलनानंतरही दादर परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 

uddhav thackeray 
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या गटाने रविवारी शिवाजी पार्क मैदानावर CJPच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी सभा आयोजित केली होती. या सभेदरम्यान शिवसैनिक, आंदोलनाचे आयोजक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे समोर आले होते. सभा संपल्यानंतरही अनेक आंदोलक आणि विद्यार्थी मैदान सोडण्यास तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागले.
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तीन गुन्ह्यांपैकी पहिला गुन्हा विनापरवानगी आंदोलनाचे आयोजन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे. दुसरा गुन्हा आंदोलनाला अधिकृत परवानगी नसतानाही नागरिकांना घटनास्थळी जमा होण्याचे आवाहन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे. तर तिसरा गुन्हा आंदोलनानंतरही विद्यार्थ्यांनी दादर परिसरातील विविध ठिकाणी आंदोलन सुरू ठेवल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या सभेला मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित राहिल्याने पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती. गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलकांना मैदान रिकामे करण्याचे आवाहन केले होते. मात्र, आंदोलक मैदान सोडण्यास तयार नसल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
या सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. “तुमची पाकिस्तानशी चर्चा करण्याची तयारी आहे, तर सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा का करू शकत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता.