एमडी प्रकरणात जिल्ह्यात पहिल्यांदाच मोक्का!

सहा जणांना अटक; ड्रग्ज डिलिंगसाठी मित्रांच्या एटीएम, यूपीआयचा वापर

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
वर्धा,
md drug case हिंगणघाट पोलिस स्टेशन अंतर्गत ५४ ग्रॅम एमडी जप्त करून पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एक जण फरार होता. आरोपींची चौकशी केली असता धक्कादायक खुलासे पुढे आले. ड्रग्ज डिलिंगसाठी मित्र किंवा परिचयाच्या व्यक्तींचे एटीएम कार्ड, अकाउंट नंबर आणि यूपीआयचा वापर करून पैशांचा व्यवहार करीत असल्याची माहिती समोर आली. हा गंभीर प्रकार असून एमडी प्रकरणात जिल्ह्यात पहिल्यांदाच सहा जणांवर मोक्का लावण्यात आल्याची माहिती हिंगणघाटचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी आज सोमवार २० रोजी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 

wardha md drug case: district invokes moka for first time, six arrested 
हिंगणघाट शहरात ड्रग्जचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. ३१ मे रोजी ५४ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी पियूष उर्फ मस्तान मुसळे (२७) रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट, निखील रामनवार (२५) रा. शास्त्री वार्ड, जय चुटे (२१) रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट, ह. मु. एकात्मता नगर जयताळा, नागपूर, कार्तिक हमंद (२९) रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट ह. मु. आशा अमर ले-आऊट, त्रिमूर्तीनगर नागपूर आणि रितीक उर्फ पकोडा खोडे (२६) रा. माता मंदिर वार्ड हिंगणघाट यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर सहावा आरोपी पंकज साठवने रा. सोमवारी क्वॉर्टर, सक्करदरा नागपूर हा फरार होता. पंकज साठवने याच्यावर नागपूर, शहर, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडी, शस्त्र अधिनियम, अंमली पदार्थ विक्री, जुगार, दारूबंदी असे २८ गुन्हे दाखल आहेत. तसेच अजनी पोलिस ठाणे, बेलतरोडी, भांदेवाडा व बुटीबोरी या पोलिस ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्यामध्ये फरार असल्याने बर्याच दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला छत्रपती संभाजीनगर येथून १७ रोजी अटक करण्यात आली असल्याची माहितीही नायक यांनी दिली.
पत्रकार परिषदेला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी उपस्थित होते.
मित्रांच्या बँक खात्याचा डिलिंगसाठी वापर ड्रग्ज डिलिंग करताना आपल्यावर संशय येवू नये म्हणून मित्र किंवा ओळखीच्या लोकांच्या बँक खाते, एटीएम कार्ड आणि यूपीआय स्कॅनरचा वापर हे आरोपी करीत असल्याची माहिती चौकशीत समोर आली. पाच जणांची चौकशी केली असता सहा महिन्यात २६ लाखांचा व्यवहार दुसर्यांच्या खात्यातून करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही इतर व्यक्तीस आपले एटीएम कार्ड, अकाउंट नंबर व यूपीआय स्कॅनर देऊ नये, असे आवाहन वर्धा पोलिस दलातर्फे करण्यात आले