नागभीड,
ghodazari-canal : विविध अडचणींवर मात करीत अखेर 18 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी शाखा कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. हा कालवा पाणी वहन करण्यास सक्षम आहे की, नाही याचे परीक्षण करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून सोमवार, 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पहिल्यांदाच या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. यामुळे कालवा परिसरातील शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या या घोडाझरी शाखा कालव्यास 23 जून 2006 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर दोन वर्षांनी या कालव्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. नागभीड तालुक्यात हा कालवा 55.55 किमी लांबीचा आहे. या कालव्याने चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मूल व सावली या पाच तालुक्यांना सिंचन होणार असल्याची माहिती आहे. या कालव्याद्वारे या तालुक्यांमधील एकूण 119 गावांमधील 29061 हेक्टर जमीन सिंचित करण्याचे उद्दिष्ट आहे.
गोसेखुर्द प्रकल्पातंर्गत उपलब्ध निधीचे वितरणात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनास त्यांच्या भूसंपादनास प्राधान्य असणे, कालव्यासाठी लागणार्या 403 हेक्टर खासगी जमिनीचे संपादन, कोरोना महामारीमुळे कालव्याचे सर्व कामे बंद असणे, रेल्वे क्रॉसिंगच्या 3 कामास रेल्वे विभागाकडून विलंबाने परवानगी मिळणे आदी कारणांमुळे या कालव्याचे काम पूर्ण होण्यास विलंब होत होता.
या कालव्यावर नागभीड तालुक्यात 2 उपसा योजना कार्यान्वित होत आहेत. त्यातील एक नवेगाव पांडव येथे, तर दुसरी कोदेपार जवळील क्रमांक 4 च्या विहिरीतून उपसा करून घोडाझरी तलावात पाणी टाकण्यात येणार आहे. नवेगाव पांडव येथील उपसा जलसिंचन योजनेतून ब्रम्हपुरी तालुक्यातील 5 आणि नागभीड तालुक्यातील 22 गावातील 4 हजार 473 हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाची व्यवस्था करण्यात येणार असून, या उपसा जलसिंचन योजनेचे कामही सुरू झाले आहे.