अहमदनगर,
Woman attacked in front of Sai Temple in Shirdi अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे साईबाबा मंदिराच्या चार क्रमांकाच्या प्रवेशद्वारासमोर रविवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिराबाहेर काकडी आणि कैरी विक्री करणाऱ्या 30 वर्षीय महिलेवर तीन ते चार महिलांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. भर गर्दीत झालेल्या या हल्ल्यामुळे मंदिर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय 30) या गंभीर जखमी झाल्या आहेत. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जयश्री क्षीरसागर या गेल्या अनेक दिवसांपासून साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी आणि कैरी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. नेहमीप्रमाणे मोठी गर्दी असताना अचानक तीन ते चार अज्ञात महिलांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या जयश्री या घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हल्लेखोर महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
दरम्यान, साई मंदिरासारख्या अतिसंवेदनशील आणि कायम वर्दळीच्या परिसरात अशी घटना घडल्यामुळे सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जखमी महिलेच्या पतीने माध्यमांशी बोलताना पत्नीचा कोणाशीही वाद नसल्याचा दावा केला. "माझी पत्नी अनेक दिवसांपासून मंदिराबाहेर काकडी आणि कैरी विकते. तीन ते चार महिलांनी तिच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती मिळाली. तिची प्रकृती गंभीर आहे. मंदिर परिसरात अशा प्रकारे महिलाच चाकू घेऊन फिरत असतील, तर शिर्डी सुरक्षित आहे का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या हल्ल्यामागचे कारण आम्हालाही माहिती नाही," असे त्यांनी सांगितले.