पिण्याच्या पाण्यात चक्क नारू!

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
नागपूर,
water supply स्मार्ट सिटी, स्वच्छ शहर, शुद्ध पाण्याचा दावा केला जात असला तरी वास्तव मात्र वेगळेच आहे. सोमलवार निकालससमोरील सावली अपार्टमेंटमध्ये नळाच्या पाण्यातून चक्क नारू आला. त्यामुळे शुद्ध पाण्याचा मनपाचा दावा फोल ठरला आहे. नारू आल्यामुळे अपार्टमेंटमधील ४० कुटुंबे दहशतीत आहेत. येथील नागरिक गेल्या आठ दिवसांपासून अशुद्ध पाणी प्राशन करीत आहेत.
 

worm found in nagpur tap water, residents allege contaminated municipal water supply 
इमारतीतील रहिवासी देवेंद्र कान्हे यांनी आज दैनिक तरुण भारत कार्यालयात येऊन आपली व्यथा मांडली आणि मनपाच्या ढिसाळ कारभारावर थेट बोट ठेवले.
 
 
नेमके काय घडले?
 
 
गेल्या ३ दिवसांपासून सावली अपार्टमेंटमधील नळांना येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी होती. कान्हे यांनी आज दुपारी पाणी गाळण्यासाठी भांडे भरले असता त्यात पातळ, लाल रंगाचे किडे तरंगताना दिसले. बारकाईने पाहिल्यावर ते नारू असल्याचे स्पष्ट झाले. आम्ही हे पाणी गेल्या ८ दिवसांपासून पितो आहोत. लहान मुले, वृद्ध सर्व हेच पाणी वापरत आहेत. जर हे किडे पोटात गेले तर काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी, असे संतप्त देवेंद्र कान्हे म्हणाले.
नारू म्हणजे काय, धोका किती?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नारू हा पाण्यातील एक परजीवी कृमी आहे. दूषित पाण्यातून तो शरीरात गेल्यास हत्तीपाय, त्वचेचे आजार, पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. एकदा का हा कृमी शरीरात शिरला की त्यावर उपचार खर्च वाढविणारा आणि त्रासदायक असतो. मनपाच्या हलगर्जीपणामुळे शेकडो लोकांचा जीव धोक्यात आला आहे.
मनपा फक्त दावे करते : रहिवाशांचा आरोप
सावली अपार्टमेंटमध्ये सुमारे ४० कुटुंबे राहतात. सर्वांना मनपाकडूनच पाणीपुरवठा होतो. रहिवाशांचा आरोप आहे की, महिन्यातून एकदा पाण्याची तपासणी होते असा दावा मनपा करते. पण प्रत्यक्षात पाईपलाईन गळक्या आहेत. गटाराचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. तक्रार केली तरी अधिकारी दखल घेत नाहीत. आमचा जीव धोक्यात घालून मनपाला शुद्ध पाण्याचे प्रमाणपत्र हवे आहे का? या प्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.
नारू म्हणजे मृत्यूला आमंत्रण
वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात, हा परजीवी कृमी एकदा शरीरात गेला की हत्तीपाय, कायमस्वरूपी दिव्यांगत्व, त्वचा सडणे अटळ आहे. उपचारासाठी लाखो रुपये आणि त्रास सहन करावा लागतो. मनपाच्या एका चुकीमुळे ४० कुटुंबांचे जीवन धोक्यात आले आहे.