अजित पवारांच्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी व जनजागृती अभियान

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
ajit-pawars-birth-anniversary : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाच्या पुढाकारातून अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 22 ते 28 जुलै या कालावधीत विशेष आरोग्य तपासणी व जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथील बाह्यरुग्ण विभागात दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध आजारांची मोफत तपासणी, निदान, समुपदेशन व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
 
 
pawar
 
या विशेष आरोग्य शिबिरात स्वेच्छा रक्तदान शिबीर, महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी व मार्गदर्शन, गर्भाशयमुख कर्करोग तपासणी, हाडांची घनता (बीएमडी) तपासणी, डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड, तसेच मुख कर्करोग तपासणी अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अभियानादरम्यान जनऔषधवैद्यक शास्त्र विभागामार्फत विविध शाळांमध्ये टाईप-1 मधुमेह, पॅलिअ‍ॅक्टीव्ह केअर, ह्युमन मिल्क बँक, कृत्रिम अवयव व पुनर्वसन सेवा, हृदयरोग प्रतिबंध आणि असंसर्गजन्य आजार यांसारख्या विषयांवर जनजागृती कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत.
 
 
 
या शिबिरामध्ये नागरिकांना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला, गंभीर आजारांचे प्रारंभिक टप्प्यात निदान, आवश्यक असल्यास पुढील तपासण्या, उपचार व शस्त्रक्रियेसाठी त्वरित मार्गदर्शन, तसेच आहार, व्यायाम, जीवनशैलीतील बदल व रोगप्रतिबंधक उपायांबाबत समुपदेशनाचा लाभ मिळणार आहे. श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, तंबाखू सेवन करणारे, स्थूलपणाचा त्रास असलेले तसेच कर्करोगाच्या जोखमीतील नागरिकांनी या विशेष आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या अभियानांतर्गत श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रक्तपेढी विभागामार्फत 22 जुलै ते 28 जुलै दरम्यान रक्तदान शिबिर, शल्यचिकित्सा विभागामार्फत 22 जुलै ते 24 जुलै दरम्यान स्तन कर्करोग तपासणी शिबीर, स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र विभागामार्फत 25 जुलै ते 27 जुलै दरम्यान गर्भाशय व मुखकर्करोग तपासणी शिबीर, अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागामार्फत 22 जुलै ते 24 जुलै दरम्यान बोन मिनरल डेनसिटी तपासणी शिबिर, नेत्र विभागामार्फत 22 जुलै ते 25 जुलै दरम्यान नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर, दंतशास्त्र विभागामार्फत 25 जुलै ते 27 जुलै दरम्यान कर्करोग तपासणी शिबीर हे विशेष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी दिली आहे.