संजय गारपवार,
मोर्शी,
new-trains : अमरावती ते नरखेड या रेल्वेमार्गावरून दाेन नव्या रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत. जबलपूरसाठी एक्सप्रेस तर नागपूरसाठी मेमू रेल्वेचा समावेश आहे. या भागातील प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी यानिमित्ताने मान्य झाली आहे.
२० वर्षांपूर्वी बडनेरा ते नरखेड हा १३५ किलोमीटरचा लोहमार्ग सुरू झाला होता. भुसावळ रेल्वे विभागाची सीमा चांदूरबाजारपर्यंत तर नागपूर रेल्वे विभागाची सीमा मोर्शी व नरखेडपर्यंत आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील तत्कालीन संरक्षण मंत्री पी. व्ही. नरसिंहराव यांनी रेल्वेलाईनच्या कामाचा शुभारंभ केला होता. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी नरखेड ते अमरावती लोहमार्गाचा शुभारंभ केला होता. सर्वप्रथम या मार्गावर नरखेड ते भुसावळ ही पॅसेंजर गाडी चालवण्यात आली होती. काही वर्षांनंतर रेल्वे बजेटमध्ये नरखेड ते काचीगुडा ही सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती. पुढे याच मार्गावर सिकंदराबाद ते जयपूर एक्सप्रेस सुद्धा सुरू करण्यात आली होती. या गाडीला मोर्शी येथे थांबा देण्यात आला होता.
यशवंतपुरम् ते इंदूर ही एक्सप्रेस सुरू केल्यानंतर चांदूरबाजार व वरुड येथे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विनंतीला मान देऊन थांबा देण्यात आला होता. या मार्गावरून मध्य प्रदेशात जाण्याकरिता तसेच नागपूर येथे जाण्यासाठी रेल्वेगाडी नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. अमरावती ते नरखेड या रेल्वेमार्गावर अन्य गाड्या सुरू व्हाव्या यासाठी राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे, वर्धा लोकसभेचे माजी खासदार रामदास तडस, अमरावती लोकसभेचे माजी खासदार नवनीत राणा तसेच अकोल्याचे खासदार संजय धोत्रे आणि मोर्शी विभागाचे आमदार उमेश यावलकर, काटोल विधानसभेचे आमदार चरणदास ठाकूर, तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे, अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे तसेच मूर्तिजापूर मतदारसंघाच्या आमदारांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या मार्गावर नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी केली होती.
खासदार व आमदारांच्या विनंतीला मान देऊन अश्विनी वैष्णव यांनी अकोला ते जबलपूर (निसर्ग आबा एक्सप्रेस) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेला अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, न्यू अमरावती, वलगाव, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड, नरखेड, पांढुर्णा, मुलताई, आमला, शिवणी, पराशिया, चौराई, छिंदवाडा, नैनापूर, जबलपूर येथे थांबा देण्यात येणार आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सातपुडा डोंगररांगांचे दर्शन होणार आहे. अमरावती ते नागपूर या मेमू रेल्वेला वलगाव, चांदूरबाजार, रिद्धपूर, मोर्शी, वरुड, पुसला, मोहाड, काटोल, कोहली, कळमेश्वर इत्यादी ठिकाणी थांबा देण्यात येणार आहे. २१९ किलोमीटरचे अंतर जवळपास चार तास ३० मिनिटांत पूर्ण करणार आहे.