अर्जुनी-मोर मतदारसंघात उद्यापासून ‘जनसेवा सप्ताह’

- स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन - आ.बडोले यांची पत्रकार परिषदेत माहिती

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
सडक अर्जुनी, 
janseva-saptah : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अर्जुनी-मोर विधानसभा मतदारसंघात आमदार इंजि. राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने 22 ते 27 जुलै या कालावधीत विविध सामाजिक व जनहितकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आ. बडोले यांनी सडक अर्जुनी येथील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.
 

janseva-saptah 
 
 
 
यावेळी बडोले यांनी सांगितले की, स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सप्ताहात वृक्षसंवर्धन व वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, फळवाटप, आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान, कृषी सन्मान पुरस्कार वितरण तसेच महिला सशक्तीकरण पुरस्कार वितरण अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. अजित पवार यांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास व लोकसेवेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन जनसेवेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा हा प्रयत्न असल्याचे आमदार बडोले यांनी सांगितले. दरम्यान, 22 जुलै रोजी कोलारगाव/कोसबी येथे वृक्षसंवर्धन व वृक्षारोपण कार्यक्रम,त्याच तेजस्विनी लॉन, सडक अर्जुनी येथे रक्तदान शिबिर होणार आहे. 23 जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय, अर्जुनी-मोर येथे फळवाटप, 24 जुलै रोजी युवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण, तहसील कार्यालय व उपजिल्हा रुग्णालय, सडक अर्जुनी परिसरात सकाळी 10 वाजता हा उपक्रम होणार आहे. 25 जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महागाव येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर तसेच स्व. अजितदादा कृषी सन्मान पुरस्कार व स्व. अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार वितरण समारंभ आशिर्वाद लॉन, सडक अर्जुनी येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. 26 जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांढरी येथे सकाळी 11 वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 27 जुलै रोजी स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त दुर्गा चौक, शेंडा रोड, सडक अर्जुनी येथे सकाळी 8 वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला, शेतकरी, रक्तदाते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी केले आहे.