कारंजा (घा.),
karnja-crime : आमच्या विरोधात वृत्तपत्रात बातम्या का प्रकाशित केल्या, असे म्हणत लाथाबुक्यांनी तसेच धारदार वस्तूने मारहाण करीत इसमास जखमी केल्याची घटना १९ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास खैरी (पुनर्वसन) येथे घडली. याप्रकरणी जखमी भूपेश बारंगे यांच्या तक्रारीवरून विजय गाखरे, मनोज भांगे, विजय काशिकर आणि शिवम कुर्डा रा. कारंजा (घा.) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तीन ते चार वर्षापूर्वी भूपेश बारंगे यांनी पत्रकार म्हणून काम केले होते. सध्या ते बांधकाम ठेकेदार असून यावरच कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. १९ रोजी रात्री ते धावडी येथे मोहित कामडी यांच्याकडे जात होते. खैरी (पुनर्वसन) येथील युवराज डोबले यांच्या घराजवळून रस्त्याने जात असताना मनोज भांगे व विजय काशिकर यांनी कार थांबविण्याचा इशारा करून दुचाकी कारसमोर उभी केली. दरम्यान, एका कारमधून विजय गाखरे व शिवम कुर्डा हे दोघे आले. त्यांनीही लाथाबुयांनी मारहाण केली. विजय गाखरे याने धारदार वस्तूने वार करीत जखमी केल्याचे पोलिस तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणी बारंगे यांनी कारंजा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.