गडचिरोलीतील निकृष्ट महामार्ग कामाच्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
गडचिरोली,
dr devrao holi गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 353 सी (सिरोंचा-आलापल्ली-आष्टी) व 130 डी (आलापल्ली-भामरागड) या महामार्गांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून संबंधित कंत्राटदाराचा परवाना रद्द करून त्याला तातडीने ब्लॅकलिस्ट करावे, अशी मागणी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
 
 
dr devrao holi
 
 
संसदेच्या अधिवेशनादरम्यान नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन डॉ. होळी यांनी या संदर्भातील सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात त्यांनी महामार्गांच्या कामाची संथ गती, निकृष्ट दर्जाचे बांधकाम, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, अपूर्ण पूल, धोकादायक वळणे, पावसाळ्यात निर्माण होणारा चिखल तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे वारंवार गंभीर अपघात होत असल्याकडे लक्ष वेधले. या मार्गांवर अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याने जनतेमध्ये तीव्र संताप असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिक, व्यापारी, वाहनचालक तसेच विविध सामाजिक संघटनांनी वेळोवेळी निवेदने, आंदोलने, रास्ता रोको व निषेध मोर्चे काढूनही संबंधित कंत्राटदार अथवा जबाबदार यंत्रणांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत डॉ. होळी यांनी व्यक्त केली.
संबंधित कंत्राटदाराचा परवाना रद्द करून त्याला ब्लॅकलिस्ट करावे, निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच संपूर्ण कामासाठी नव्याने पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवून गुणवत्तापूर्ण व वेळबद्ध पद्धतीने काम पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी डॉ. होळी म्हणाले, गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी जिल्ह्यात रस्ते ही जनतेची जीवनवाहिनी आहे. कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत असतील, तर अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.dr devrao holiदरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाकडून तातडीने अहवाल मागवून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याची माहिती डॉ. होळी यांनी दिली.
या भेटीदरम्यान एससी/एसटी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. नरेंद्र उंदीरवाडे, गडचिरोली जिल्हा महासचिव अमोल कुळमेथे तसेच डॉ. मिलिंद रामटेके उपस्थित होते.