मुंबई,
Dharmashalas at 6 major hospitals in Maharashtra राज्यातील सहा प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा आणि विश्रामगृहे उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या प्रकल्पासाठी गुजरातमधील सेवादान आरोग्य फाऊंडेशन या संस्थेला जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या धर्मशाळांच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपये किमतीच्या सरकारी जमिनी वार्षिक केवळ एक रुपया या नाममात्र भाड्याने ४९ वर्षांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.वैद्यकीय शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय, मुंबईतील सर जे. जे. समूह रुग्णालय, नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय या सहा ठिकाणी धर्मशाळा उभारण्यात येणार आहेत.

अहमदाबादस्थित हर्षद शहा आणि मोहित शहा यांच्या सेवादान आरोग्य फाऊंडेशनमार्फत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार, या धर्मशाळांमधील निवास आणि इतर सुविधा संबंधित शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठीच उपलब्ध असतील. या जागांचा व्यावसायिक, व्यापारी किंवा खासगी कारणांसाठी वापर करण्यास स्पष्टपणे मनाई करण्यात आली आहे.धर्मशाळांचे बांधकाम करण्यापासून ते निधी उभारणी, इमारतीचे सुसज्जीकरण, संचालन, देखभाल, स्वच्छता, सुरक्षा आणि आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करण्याची जबाबदारी संस्थेची असेल. त्याचबरोबर विमा काढणे आणि आवश्यक शासकीय परवानग्या मिळवणेही संस्थेलाच बंधनकारक राहणार आहे. सर्व परवानग्या मिळाल्यानंतर दोन वर्षांच्या आत बांधकाम पूर्ण करून धर्मशाळा सुरू करणे आवश्यक असेल.
प्रत्येक प्रकल्पाच्या देखरेखीसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमार्फत प्रकल्पाची प्रगती, उपलब्ध सुविधा, आकारले जाणारे शुल्क, तक्रारींचे निवारण, अग्निसुरक्षा, इमारतीची संरचनात्मक सुरक्षितता आणि शासनाने घातलेल्या अटींचे पालन यावर नियमित देखरेख ठेवली जाणार आहे.कराराचा कालावधी संपल्यानंतर किंवा कोणत्याही कारणाने करार रद्द झाल्यास धर्मशाळेची इमारत, तिच्या सर्व पायाभूत सुविधा आणि संबंधित मालमत्ता कोणताही मोबदला न घेता राज्य सरकारकडे हस्तांतरित करावी लागणार आहे. शासन निर्णयात ही अटही स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. सेवादान आरोग्य फाऊंडेशनने यापूर्वी गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम, उत्तराखंड, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांतील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा आणि विश्रामगृहे उभारली आहेत. आता महाराष्ट्रातील सहा प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारच्या सुविधा उभारल्या जाणार आहेत.