चिखलाने माखलेल्या ट्रॅक्टरावर जिल्ह्याभर लगाम

- तरुण भारतच्या वृत्ताची दखल ः देवरी तहसीलदार अ‍ॅक्शन मोडवर

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
मुल्ला, 
muddy-tractors : ‘दैनिक तरुण भारत’ ने जनहिताचा प्रश्न लावून धरत 17 जुलै रोजी प्रकाशित केलेल्या ‘चिखलाने माखलेल्या ट्रॅक्टर्सचा रस्त्यावर धुमाकूळ’ या वृत्ताची प्रशासनाने अखेर जिल्हाभर गंभीर दखल घेतली आहे. वृत्त प्रकाशित होताच जिल्ह्याभर प्रशासन खडबडून जागे झाले असून देवरी तहसीलदारांनी चिखलाने माखलेले ट्रॅक्टर सार्वजनिक रस्त्यावर आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व तलाठी यांना आपल्या कार्यक्षेत्रात अशा ट्रॅक्टरांवर लक्ष ठेवून नियमभंग करणार्‍यांविरुद्ध त्वरित कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
 
 
 
muddy-tractors
 
 
 
अनेक दिवसांपासून शेतातून चिखलाने माखलेले ट्रॅक्टर थेट रस्त्यावर धावत असल्याने रस्ते चिखलमय होत होते. त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक तसेच पादचार्‍यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होत होता. या प्रकारामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याबाबत नागरिकांकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात होती. ‘दैनिक तरुण भारत’ने हा प्रश्न केवळ मांडलाच नाही, तर प्रशासनाचे लक्ष वेधून जनतेच्या सुरक्षेचा मुद्दा ठळकपणे पुढे आणला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने निर्णय घेत धडक कारवाईचे आदेश दिल्याने आता नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक रस्त्यांवर चिखल साचण्याचे प्रकार कमी होतील, वाहतूक अधिक सुरक्षित होईल आणि अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 
 
चिचगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
 
 
देवरी तालुक्यातील चिचगड पोलिस ठाण्याअंतर्गत नुकताच एका ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दखल करण्यात आला असून गीरीष पीतांबर कलीहारी (24) रा. आलेवाडा, ता. देवरी असे त्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. गिरीषने त्याच्या ताब्यातील चिखलानी माखलेले ट्रॅक्टर मुख्य रस्त्यावरून नेत असता चिखलापासून रहदारीला घातक परिणाम होण्याची शक्यतेने त्याचेविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.