गोंदिया,
rainfall-in-gondia : गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ४२६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी ९० टक्के आहे. असे असताना पावसाच्या नोंदीवर लक्ष दिल्यास जिल्ह्यातील काही भागात समाधानकारक पाऊस झाला असला तरी काही भागात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाची नोंद ९० टक्के झाली असली तरी अर्धा जिल्हा कोरडाच असल्याचे दिसून येत असून पावसाने ‘फिफ्टी-फिफ्टी’ वाटणी केल्याचे दिसून येत आहे.

पावसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरी १२२० मिलिमीटर पाऊस पडतो. यातच यंदा मान्सूनला उशीराने सुरूवात झाली. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरुवातीपासून पावसाने सुरुवात केली. या पावसावर शेतकर्यांनी धान रोपवटिका तयार केल्या. मात्र, ८ जुलैपासून पावसाने दडी मारली. पावसाच्या विश्रांतीमुळे वातावरणात प्रचंड उकाडा वाढला, टाकलेल्या धानाच्या रोपवाटिका करपू लागल्या. यातच १८ जुलैपासून पावसाने पुनरागमन केले. त्यामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिक सुखावला आहे. जिल्हा प्रशासनाच्या नोंदीनुसार २१ जुलैपर्यंत गोंदिया जिल्ह्यात ४२६.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, ही सरासरी ९० टक्के इतकी आहे.
तर जून ते सप्टेंबर या कालावधीतील अपेक्षित १,२२०.३ मिमी पावसापैकी आतापर्यंत ३५ टक्के पर्जन्यमान झाले आहे. दरम्यान, नोंदीनुसार जिल्ह्यात सर्वाधिक समाधानकारक पाऊस सालेकसा तालुक्यात झाला असून, तेथे ५८७.७ मिमी (१२५.३ टक्के) पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ गोरेगाव येथे ५१०.१ मिमी (१२६ टक्के) आणि आमगाव येथे ५७०.१ मिमी (९९ टक्के) पाऊस झाला आहे. गोंदिया तालुक्यात ४५३ मिमी (९७.९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. याउलट अर्जुनी-मोरगाव (३२०.३ मिमी - ५७.३ टक्के), तिरोडा (२८७.६ मिमी - ६१.२ टक्के), देवरी (३५१.६ मिमी - ७१.२ टक्के) आणि सडक-अर्जुनी (४०२.२ मिमी- ७२.४ टक्के) या तालुक्यांमध्ये अद्याप सरासरीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाल्याचे महसूल विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होते. एकंदरीत जिल्ह्यात काही भागात समाधानकारक तर काही भाग अद्यापही कोरडाच आहे असे म्हणता येईल.
जिल्ह्यात पावसाची रिपरिप ...
जिल्ह्यात २१ जुलै रोजी दिवसभर पावसाची रिपरिप दिसून आली असून गोरेगाव तालुक्यात २३.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर अर्जुनी-मोरगाव २२.९ मिमी, तिरोडा २०.१ मिमी, सडक-अर्जुनी १६.४ मिमी, देवरी ७.४ मिमी, सालेकसा ५.९ मिमी, आमगाव १.९ मिमी आणि गोंदियात १.८ मिमी पावसाची नोंद झाली.
२४ तासात अतिवृष्टीची शक्यता...
पुढील २४ तासांत भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.